राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा असलेल्या आमदार परिचारक समर्थकांना भाजपकडून पदे  - BJP posts to MLA Paricharak supporters who in discussing joining NCP | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा असलेल्या आमदार परिचारक समर्थकांना भाजपकडून पदे 

भारत नागणे 
शनिवार, 30 जानेवारी 2021

आमदार परिचारक समर्थक कार्यकर्त्यांच्या निवडी करून भाजपनेही राष्ट्रवादीला शह दिल्याची चर्चा आहे. 

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांची भाजपच्या विविध संघटनात्मक पदांवर निवडी जाहीर केल्या आहेत. यामध्ये आमदार परिचारकांचे कट्टर समर्थक असलेल्या सुभाष मस्के यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, तर नगरसेवक विक्रम शिरसट यांची पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आज (ता. 30 जानेवारी) जाहीर केली. त्यामध्ये पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्हा कार्यकारणीवर बहुतांश आमदार परिचारक समर्थकांची वर्णी लावण्यात आलेली आहे. यामुळे आमदार प्रशांत परिचारक भाजपमध्येच राहणार की राष्ट्रवादीला जवळ करणार? या विषयी पुन्हा एकदा तालुक्‍यात चर्चा सुरू झाली आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार परिचारक यांच्या गाठीभेटीदेखील वाढल्या आहेत. अलिकडेच अजित पवारसमर्थक करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घेवून आमदार परिचारक आणि पवार यांच्यात एक बैठकदेखील घडवून आणली आहे. या बैठकीत आमदार परिचारक यांनी मागणी केल्यानुसार बंधारे दुरूस्तीसाठी निधीही मंजूर केला आहे. 

त्या बैठकीनंतर आमदार परिचारक लवकरच राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच, आज आमदार परिचारक समर्थकांची मात्र भाजपच्या विविध संघटनात्मक पदांवर निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. 

यामध्ये आमदार परिचारकांचे कट्टर समर्थक आणि धनगर समाजाचे नेते प्रा. सुभाष मस्के यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक विक्रम शिरसट यांची निवड केली आहे. पंढरपूर तालुकाध्यक्षपदीही परिचारक समर्थक भास्कर कसगावडे यांची निवड जाहीर केली आहे. 

पंढरपूर तालुका आणि शहर भाजप पदाधिकारी आणि कार्यकारणीवर आमदार परिचारक समर्थक कार्यकर्त्यांच्या निवडी करून भाजपनेही राष्ट्रवादीला शह दिल्याची चर्चा आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूर आणि सांगोला येथे प्रमुख पदाधिकारी आणि आमदार खासदारांची एक बैठकही त्यांनी घेतली. त्यानंतर आज जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये पंढरपूर तालुक्‍यातील भाजपवर आमदार परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांना संधी देवून परिचारकांचे भाजपातील स्थान बळकट केले आहे. आगामी पोटनिवडणुकीत भाजप कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख