भाजप सदस्याची गैरहजेरी : सुभाष देशमुख गटाचा विजय देशमुख गटाला शह देण्याचा प्रयत्न?

सभापती निवडीच्या सभेला काही सदस्य अनुपस्थित असल्याचे सोमवारी दिसून आले.
BJP corporator absent from Solapur Municipal Corporation's standing, transport committee's planned election
BJP corporator absent from Solapur Municipal Corporation's standing, transport committee's planned election

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या स्थायी व परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीस राज्याच्या नगरविकास विभागाने सोमवारी (ता. 15 मार्च) पुन्हा एकदा स्थगिती दिली. सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा देणाऱ्या भाजपचे नगरसेवक आजच्या सभेला गैरहजर होते. भाजपचे सदस्य अनुपस्थित राहण्यामागे भाजपांतर्गत गटातटाचे राजकारण असल्याची चर्चा आहे. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (मालक) गटाला शह देण्यासाठी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख (बापू) गटाने ही खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

गेल्या महिन्यात झालेली स्थायी आणि परिवहन समितीच्या सदस्यांची निवड ही नियमांप्रमाणे झाली नसल्याचे कारण देत सोमवारी होणारी निवडणूक सरकाच्या नगरविकास विभागाने स्थगित केली आहे. ही निवडणुका दुसऱ्यांदा स्थगित झाल्याने महापलिकेतील सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. 

दरम्यान, सभापती निवडीच्या सभेला काही सदस्य अनुपस्थित असल्याचे सोमवारी दिसून आले. स्थायी सभेला भाजपच्या मेनका राठोड, एमआयएमचे रियाज खरादी, तर परिवहन सभेला एमआयएमचे सदस्य अरबाज खरादी हे अनुपस्थित होते. भाजपचे सदस्य अनुपस्थित राहण्यामागे भाजपचे अंतर्गत गटातटाचे राजकारण असल्याची चर्चा आहे. "मालक' (विजयकुमार देशमुख) गटाला शह देण्यासाठी "बापू' (सुभाष देशमुख) गटाने ही खेळी केल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली होती. 

एमआयएमच्या तक्रारीचा संदर्भ देत नगरविकास विभागाने या अगोदर 5 मार्च रोजी स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतिपदाची निवडणूक स्थगित केली होती. त्या आदेशाविरोधात भारतीय जनता पक्षाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यानच्या काळात नगरविकास विभागाने निवडणूक स्थगितीचा आदेश मागे घेतला. त्यानंतर न्यायालयानेही स्थगिती उठवत तत्काळ निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही निवडणूक सोमवारी (ता. 15 मार्च) सकाळी साडेअकराला होणार होती. परंतु तत्पूर्वीच साडेदहाच्या सुमारास स्थायी-परिवहन सदस्य निवडीचा ठराव निलंबित केल्याचे नगरविकास खात्याचे पत्र महापालिकेला मिळाले. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या पत्राची माहिती देत सरकारी निर्णयानुसार सभापती निवडीची प्रक्रिया स्थगित केल्याचे जाहीर केले. या वेळी प्रभारी नगरसचिव रऊफ बागवान उपस्थित होते. 

नगरसचिव दंतकाळेंना कोरोना 

नगरसचिव प्रवीण दंतकाळे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दंतकाळे कुटुंबीय उपचारासाठी महापालिकेच्या बॉईज कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनामुळे नगरसचिव दंतकाळे हे सोमवारी स्थायी आणि परिवहन सभापतीच्या निवडीवेळी अनुपस्थित होते. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त प्रभार करसंकलन अधिकारी रऊफ बागवान यांच्याकडे सोपविण्यात आली होती. 


सरकारकडून मार्गदर्शन मागविण्यात येईल : जिल्हाधिकारी 

स्थायी आणि परिवहन सभापती पदाची निवडणूक स्थगित केल्याचा अहवाल सरकारला पाठवून त्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात येईल. सरकारी मार्गदर्शनानुसार निवडणुकीसंदर्भात पुढील कार्यवाही होईल, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नमूद केले. 

निवडणूक प्रक्रिया संदिग्ध असल्याचा खुलासा केला होता  

स्थायी-परिवहन सदस्यांच्या निवड प्रक्रियेबाबत विभागीय आयुक्तांनी पत्र पाठवून विचारणा केली होती. त्यावर मी ही निवडणूक प्रक्रिया संदिग्ध असल्याचा खुलासा केला होता, असे महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी म्हटले आहे. 


विरोधकांकडून राज्यातील सत्तेचा दुरुपयोग 

राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करीत विरोधी पक्षांनी पुन्हा सभापती निवडीत हस्तक्षेप केला आहे. भाजप याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, असे सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com