सोलापूरने देशमुखांइतका पुळचट पालकमंत्री कधी अनुभवला नव्हता : भालके 

जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवत असताना आपणाला जेल भोगावी लागली, हे कोणत्या निष्क्रियतेचे लक्षण आहे.
Bharat Bhalke's reply to Vijay Kumar Deshmukh criticizing Ajit Pawar
Bharat Bhalke's reply to Vijay Kumar Deshmukh criticizing Ajit Pawar

मंगळवेढा : अजित पवार यांच्यावर नामधारी उपमुख्यमंत्री अशी टिका सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली होती. त्याला आमदार भारत भालके यांनी प्रत्युत्तर देत "देशमुखांइतका पुळचट पालकमंत्री जिल्ह्याने कधी अनुभवला नव्हता,' अशी बोचरी टीका केली आहे. 

अजित पवार यांनी पंढरपूर आणि माढ्यातील नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर कोणीही मदत घोषित केली नव्हती, त्यावरून देशमुख यांनी पवारांवर टीका केली होती. त्याला पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भालके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

तुमच्या निष्क्रियतेचा जिल्ह्याला फटका 

देशमुख यांच्या निष्क्रियतेबद्दल आमदार भालके यांनी सांगितले की जिल्ह्याला 2015 मध्ये दुष्काळ निवारण्यासाठी मी व गणपतराव देशमुख यांनी अधिवेशन काळात 394 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली होती. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फक्त 52 कोटी रुपये दिले. उर्वरित 350 कोटी मंजूर करून आणण्याची हिम्मत आपण दाखवू शकला नाहीत. त्यामुळे आपण किती कामसू आहात, हे जनतेला माहीत आहे. आपल्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान होऊनदेखील विमा मिळाला नाही, याबद्दल आपण जाब विचारू शकला नाही. आपल्या निष्क्रियतेचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसला. 

नामधारी पालकमंत्री 

महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढ्यातील राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्षपदी असताना पाच वर्षांत केवळ घोषणेशिवाय आपण काय केले? संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत मी सभागृहात आवाज उठवल्यानंतर सरकारकडून स्मारकाबाबत घोषणा झाली; परंतु पालकमंत्री म्हणून आपण निधी मिळवण्याबाबत आपली उदासिनता बघायला मिळाली. मंगळवेढ्यातील कृष्ण तलाव सुशोभीकरण करून देणार, असे तलाव पाहणी करण्यास आल्यानंतर आपण मंगळवेढेकरांना शब्द दिला होता. तो अजून पूर्ण झाला नाही. त्यामुळे आपण नामधारी पालकमंत्री होता का, असा सवाल भालके यांनी देशमुख यांना केला आहे. 

राईनपाडातील बळींच्या कुटुंबीयांच्या आश्‍वासनाचे काय झाले?

राईनपाडा हत्याकांडील दुर्दैवी बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत, कुटुंबीयांतील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेणे व घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी आम्ही केली होती, ती देण्यास मी कटिबद्ध आहे, असे तालुक्‍यातील खवे या गावात येऊन तुम्ही सांगून गेला. पण संबंधित कुटुंबीयांतील सदस्यांना अजून शासकीय नोकरी मिळाली नाही. घरकुलही मिळाले नाही, पुढे आपण का निष्क्रिय राहिलात, याचे कारण समजू शकले नाही. 

उजनी ते सोलापूर पाइपलाइन करता आली नाही 

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "देशात बारामतीसारखी शंभर शहरे निर्माण झाली, तर देश विकसित होईल,' असे विधान बारामतीत येऊन केले होते. त्यामुळे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण "रबर स्टॅम्प' म्हणत असाल तर सोलापुरात "स्मार्ट सिटी' च्या उभारणीत आपण एक दगडदेखील लावू शकला नाही, याला निष्क्रियतेचा कळस म्हणणे सोयीचे ठरेल. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेली स्वतंत्र पाइपलाइन आपणाला पूर्णत्वास नेता आली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवत असताना आपणाला जेल भोगावी लागली, हे कोणत्या निष्क्रियतेचे लक्षण आहे, असा प्रश्‍न भालकेंनी उपस्थित केला. 

गारमेंट पार्कच्या घोषणेचे काय झाले? 

वस्त्रोद्योग खात्याचा कारभार पाहताना नरसिंग मेंगजी मिलच्या जागेत गारमेंट पार्क उभा करण्याची घोषणा केली होती, त्या घोषणेचे काय झाले. शहरातील राजकीय कुरघोडीतून आपल्याला सवड मिळाली नाही आणि सांभाळलेल्या मंत्रिपदाच्या काळात विविध खात्याला न्याय दिला असता, तर राज्याला फायदा झाला असता. एका चौकात बसून अनेक वर्ष घालवलेल्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा उपरोधिक टोला भालके यांनी लगावला. 

सर्वात निरुपयोगी आमदार आपण आहात 

सोलापूर विमानतळाबाबत प्रस्ताव येताच अजितदादांनी निधी मंजूर केला. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आपण भरदुपारी झोपा काढल्या नसत्या, तर आज विमानतळ उभे राहिलेले दिसले असते. उजनी धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आलेल्या अपयशामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळू शकले नाही. आरोग्य खात्याचा कारभार मंत्री म्हणून पाहताना जिल्ह्यातील रिक्तपदेही आपल्याला भरता आली नाहीत. राज्यातील सर्वात निरुपयोगी आमदारांची यादी तपासली, तर आपण सर्वात वरच्या क्रमांकावर आहात, हे विसरू नका. आपल्या मतदारसंघात सातत्याने लोकांनी विश्वास ठेवून देखील मतदारसंघाचा बकालपणा कायम राहिला असून पायाभूत सोयी सुविधा मिळविण्यासाठी आजही लोकांना त्रास होत आहे. उर्वरीत कार्यकाळात तरी सोलापूर उत्तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकासआघाडीकडून प्रयत्न करून कामे करावीत, असा सल्ला भालके यांनी माजी पालकमंत्री देशमुख यांना दिला. 
 
Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com