‘छत्रपती’ हा माजी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम मुलांचे पुनर्वसन केंद्र आहे का? - Appointment of officer without interview in Chhatrapati factory : Prithviraj Jachak | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

‘छत्रपती’ हा माजी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम मुलांचे पुनर्वसन केंद्र आहे का?

राजकुमार थोरात
बुधवार, 16 जून 2021

अधिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दीपावलीच्या फराळातील 'अनारसा ' ज्यांना लाभला असेल त्यांनी अशा व्यक्तीची दुसऱ्या संस्थेत नेमणूक करावी.

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये मुलाखत न घेताच एका अकार्यक्षम अधिकाऱ्याची आकृतीबंधाला बगल देवून नियुक्ती केली आहे, असा आरोप छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे. छत्रपती कारखाना हा ऊस उत्पादक सभासदांच्या कल्याणासाठी आहे की माजी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम मुलांचे पुनर्वसन केंद्र आहे, असा सवालही जाचक यांनी केला आहे. (Appointment of officer without interview in Chhatrapati factory : Prithviraj Jachak)

छत्रपती कारखान्यामध्ये गेल्या आठवड्यात काही अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मुलाखत घेऊन नियुक्या करण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये एका माजी अधिकाऱ्याच्या मुलाची मुलाखत न घेताच नियुक्ती केल्याचा आरोप साखर संघाचे माजी अध्यक्ष जाचक यांनी केला आहे. 

हेही वाचा : आमचे आमदार हरवले आहेत हो....! 

याबाबत पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. बँकेची व वित्तीय संस्थांची शेकडो कोटी रुपयांची देणी आहेत. कारखाने २०२०-२१ गाळप हंगामातील सभासदांची संपूर्ण एफआरपीची रक्कम अद्याप दिलेली नाही. कारखान्याच्या कामगारांचे पगार थकले आहेत. सभासदांची पावणे दोन कोटी रुपयांची ठेव संपून एक वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्याप संचालक मंडळाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. 

गळीत हंगाम सुरु असताना कारखान्यास गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस पुरवठा होत नाही. तसेच, इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये दर कमी मिळत असल्याने उस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. कारखान्याची बिकट परिस्थिती असताना व संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेला असताना संस्थेच्या परंपरेप्रमाणे नैतिक धोरण अवलंबणे गरजेचे आहे. मात्र, दिलेल्या शब्द व प्रतिष्ठा पाळण्यासाठी सभासदांचे हित डावलून अकार्यक्षम अधिकाऱ्याची मुलाखत न घेताच नियुक्ती केली आहे, असा आरोप जाचक यांनी केला आहे. 

जाचक म्हणाले की, कारखान्यामध्ये असे अनेक अधिकारी व कर्मचारी झाले आहेत. एका सहकारी कारखान्याला व सभासदांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दीपावलीच्या फराळातील 'अनारसा ' ज्यांना लाभला असेल त्यांनी अशा व्यक्तीची दुसऱ्या संस्थेत नेमणूक करावी. छत्रपती कारखान्याच्या सर्व सभासदांना तसेच युवकांनी कारखान्याच्या व आपल्या स्वतःच्या प्रपंचासाठी येणाऱ्या काळामध्ये जागरुक राहण्याची गरज आहे. 

या संदर्भात छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख