दामाजी कारखाना निवडणूक : कडाक्‍याच्या थंडीतही आरोप-प्रत्यारोपांनी मंगळवेढ्याची हवा तापली  - Allegations and counter-allegations against the ruling-opponents of Damaji factory in Mangalwedha taluka | Politics Marathi News - Sarkarnama

दामाजी कारखाना निवडणूक : कडाक्‍याच्या थंडीतही आरोप-प्रत्यारोपांनी मंगळवेढ्याची हवा तापली 

हुकूम मुलाणी
शनिवार, 5 डिसेंबर 2020

कारखान्याच्या कारभारावरून आजी-माजी संचालकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली. 

मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्‍यात एकमेव सहकारी असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कारखान्याच्या कारभारावरून आजी-माजी संचालकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली. 

मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा ऊस या पूर्वी सांगली व कोल्हापूर भागात जात होता. ऊस बिलापोटी मिळणाऱ्या रकमेची शाश्‍वती नव्हती. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे गाळप तालुक्‍यातच करता यावे, यासाठी (स्व.) किसनलाल रामचंद्र मर्दा वकील यांनी तालुक्‍यात सहकार तत्वावर 28 कोटी खर्चून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली.

अतिशय काटकसरीने कारखान्याचा कारभार करत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. परंतु सत्ता बदलानंतर कारखान्यावर घेतलेल्या कर्जात वाढ होत गेली. 

माजी संचालक, शेतकरी संघटनेचे नेते दामोदर देशमुख यांनी निवडणुकीच्या तोंडावर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यासह संचालक मंडळावर कर्जाची रक्कम 20 कोटींवरून 100 कोटींवर गेल्याचा आरोप केला. विद्यमान संचालक मंडळाने कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभारल्याचा दावा केला. 

सध्या शेतकऱ्यांच्या ऊसबिलाच्या रकमा वेळेवर दिल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत. ऊस उत्पादक सभासदांनी याचा गांभीर्याने विचार न केल्यास भोगावती व स्वामी समर्थ कारखान्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देशमुख यांनी सभासदांना देत कारखान्याची वाटचाल दिवाळखोरीकडे चालल्याचा आरोप केला. 

या आरोपाला विद्यमान संचालक लक्ष्मण जगताप यांनी प्रत्युत्तर दिले. असंतुष्ट मंडळींच्या पतसंस्थेने तोडणी वाहतूक यंत्रणेला दिलेले सव्वादोन कोटी रुपये रक्कम कर्जारुपाने दिले होती. कर्ज नवं-जुनं करण्याच्या अटीवर ही रक्कम भरून घेतली. नव्याने कर्ज न ऊस तोडणी ठेकेदारांवर धनादेश बाऊन्स झाल्याचे गुन्हे दाखल करत ट्रॅक्‍टरमालकांना दुष्काळी परिस्थितीत नाहक त्रास दिला. शेतकरी संघटनेचे नेतृत्व करत असताना मर्दा वकिलांना दिलेला त्रास तालुक्‍यातील जनता अद्याप विसरलेली नाही, याची जाणीव ठेवा. 

पदाच्या लालसेपोटी (स्व.) चरणूकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक म्हणून पाच वर्षे काम करताना आपण शेतकरी संघटना वाऱ्यावर सोडली, अशा शब्दांत जगताप यांनी देशमुख यांना टोला लागवला. 

संत दामाजी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आल्याने सध्याच्या कडाक्‍याच्या थंडीतही मंगळवेढा तालुक्‍यातील राजकीय वातावरण मात्र गरम झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख