म्हैसाळ योजनेच्या पाण्यावरून भालके-परिचारक समर्थकांत रंगले ‘सोशल वाॅर’
Allegations against Bhalke-Paricharak supporters continue over the waters of Mahisal Yojana

म्हैसाळ योजनेच्या पाण्यावरून भालके-परिचारक समर्थकांत रंगले ‘सोशल वाॅर’

म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावरून भालके व परिचारक यांच्यात श्रेयवाद सुरू झालाआहे.

मंगळवेढा :  म्हैसाळ योजनेचे पाणी 21 वर्षांनंतर आज (ता. १४ मे) मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात कालव्याच्या माध्यमातून आले. म्हैसाळ योजनेचे पाण्याच्या श्रेयवादावरून सोशल मीडियामध्ये भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांच्या समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोपांसह शाब्दीक खडाजंगी सुरू झाली आहे. त्यामध्ये वर्तमानपत्रातील जुन्या बातम्या व व्हिडीओ क्लिप यांचा आधार घेतला जात आहे (Allegations against Bhalke-Paricharak supporters continue over the waters of Mahisal Yojana)
       
नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा राजकीय आखाडा पाणीप्रश्नावरून मोठा गाजला. त्यामध्ये म्हैसाळ, मंगळवेढा उपसा सिंचन योजना या योजनेवरून आरोप-प्रत्यारोपदेखील झाले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रचारसभेत दिलेला शब्द पाळला, त्यामधील मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षणदेखील सुरू झाले. आज सकाळी त्यांच्या फेसबुक पेजवर म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यास देण्यात आल्याने दिलेला शब्द पाळल्याचे म्हटले आहे. 

पोटनिवडणुकीच्‍या आखाड्यात भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले, त्या विजयामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांचे योगदान मोठे आहे. शिवाजी चौकात आमदार प्रशांत परिचारक यांनी दंड थोपटले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भगिरथ भालके यांनी त्याला प्रत्युत्तर देत दंड थोपटायचे होते तर स्वतः का उभे राहिले नाही असा सवाल करून हिम्मत असेल तर 2024 ला उभे राहा असे आव्हान दिले.

हे वादळ शमते न शमते तोपर्यंत आज म्हैसाळ योजनेची मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनच्या माध्यमातून पाणी मंगळवेढ्यातील दक्षिण भागात आले, त्यावेळी भगिरथ भालके यांनी आपल्या समर्थकांसह जाऊन पाण्याचे पूजन केले, त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले. 

त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनीदेखील या पाण्याचे पूजन करून त्याचे फोटो सोशल मीडिया टाकल्यानंतर हा श्रेयवाद सुरू झाला. त्यामध्ये (स्व.) भारत भालकेंनी आतापर्यंत कशा पद्धतीने प्रयत्न केले, हे त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियामध्ये सांगितले.  

आमदार परिचारक गटाच्या समर्थकांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासमवेत काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन काम वेगाने करा, अशा दिलेल्या सूचनांचे वर्तमानपत्रातील कात्रणे सोशल मीडिया टाकून आपणही प्रयत्न केल्याचे सांगितले. पंतप्रधान सिंचन योजनेतून प्रास्तावित ७ योजनांपैकी म्हैसाळ योजनेसाठी अंदाजे तीन हजार कोटी रुपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पैसे उपलब्ध करून दिल्यामुळे या योजनेचे पाणी या भागाला आल्याचे भाजप समर्थकांनी सांगितले.

सायंकाळच्या सत्रात भालके समर्थकांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील मंगळवेढा येथील प्रचार सभेतील (स्व.) भारत भालके यांच्या भाषणाची व्हिडिओ व्लिप सोशल मीडिया टाकली. त्यामध्ये भालके यांनी परिचारकांवर विधिमंडळात एकही शब्द न उच्चारता, 35 गावाला बाटलीभरदेखील पाणी मिळणार नाही, अशी खिल्ली उडवण्याचा समाचार घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात आला.

भाजप समर्थकांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमधील (स्व.) आमदार भालके यांनी म्हैसाळ योजनेबद्दल मांडलेले मताचे कात्रण सोशल मीडिया टाकले, त्यामध्ये ही योजना मृगजळ असून पाणीपट्टी जास्त असल्याने परवडत नसल्याचे म्हटले आहे. एकूणच म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावरून भालके व परिचारक यांच्यात श्रेयवाद सुरू झाला. हा वाद असाच सुरू राहिल्यास भविष्यात काही प्रश्नांची मात्र यात फरफट होत राहणार, हे मात्र निश्चित.
 

Related Stories

No stories found.