मारवाडी वकिलांनंतर तब्बल ४५ वर्षांनंतर मंगळवेढ्यास मिळाला भूमिपुत्र आमदार 

पूर्वी तो मोहोळशी जोडला गेला होता.
After 45 years, Mangalveda got a local MLA in the form of samadhan Avtade
After 45 years, Mangalveda got a local MLA in the form of samadhan Avtade

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तब्बल ४५ वर्षानंतर मंगळवेढा तालुक्यास समाधान आवताडे यांच्या रूपाने भूमिपुत्र आमदार मिळाला आहे. समाधान आवताडे यांनी आमदार परिचारकांच्या मदतीने ही संधी साधली आहे. मंगळवेढ्याचे स्थानिक आमदार म्हणून कि. रा. मर्दा ऊर्फ मारवाडी वकील होते. त्यांच्यानंतर आवताडे यांच्या रुपाने तब्बल ४५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदार मिळाला आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या 2009 च्या पुनर्रचनेपूर्वी मंगळवेढा तालुका मोहोळ मतदार संघाला जोडला होता. त्यामुळे वरिष्ठ नेते जो उमेदवार देतील, त्यांना आमदार करण्याची भूमिका या तालुक्यातील मतदारांनी पार पडली. त्यामध्ये एन. एस. कांबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे  डॉ. रामचंद्र साळे ह्या तालुक्याबाहेरील व्यक्ती आमदार झाल्या. डॉ. साळे हे मूळचे मंगळवेढ्यातील लक्ष्मी दहिवडी येथील असले तरी त्यांचे वास्तव्य मात्र सांगोल्यात होते, तरीही त्यांना अवघ्या 21 दिवसांत तालुक्यातील जनतेने आमदार केले. माजी मंत्री हे अक्कलकोट तालुक्यात आहेत. तसेच, विमल बोऱ्हाडे, एन. एस. कांबळे हेही बाहेरचे होते.

हे तिघेही मतदारसंघाच्या बाहेरील चेहरे होते.  केवळ पक्षाच्या नेत्यांनी त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यानंतर तालुक्यातील जनतेने तो आदेश शिरसावंद्य मानून त्यांना विजयी केले. मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या या लोकप्रतिनिधींनी सरकारच्या माध्यमातून विविध कामे करताना तालुक्याचा दुष्काळ हटविण्याचे ठोस काम करण्यात ते यशस्वी झाले नाहीत, त्यामुळे आजही पाण्यासाठी तालुक्यातील जनतेला संघर्ष करावा लागतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुका पाण्याच्या मुद्यावर लढल्या गेल्या. 

या मतदारसंघात एन. एस. कांबळे हे पाच वर्षे, विमल बोऱ्हाडे या पाच वर्षे, लक्ष्मण ढोबळे यांनी सर्वाधिक म्हणजे १९ वर्षे, रामचंद्र साबळे पाच वर्षे आणि भारत भालके हे ११ वर्षे म्हणजे तब्बल ४५ वर्षे या मतदारसंघातून बाहेरची व्यक्ती निवडून येत होती. मंगळवेढा तालुक्याला ४५ वर्षांनंतर आवताडे यांच्या रुपाने स्थानिक आमदार मिळाला आहे.

सन 2009 च्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ पुन्हा पंढरपूरशी जोडला गेला. पूर्वी तो मोहोळशी जोडला गेला होता. त्यामुळे मंगळवेढ्याच्या नशिबी इतर तालुक्यातील आमदारांवर विसंबून राहावे लागत होते. पंढरपूर मतदारसंघ तयार झाल्यानंतर भारत भालके यांना आमदार होण्याची संधी मिळाली. तब्बल अकरा वर्षे त्यांनी या मतदारसंघात मोठ्या खुबीने काम करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांना शेवटी कोरोनाने घेरले आणि त्यातच त्यांचे निधन झाले

या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना संधी देण्यात आली होती, तर भाजपकडून परिचारक यांची ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीशी लावत त्यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्यामुळे ही निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. पक्षीय पातळीवर ही निवडणुक भालके व आवताडे यांच्यात न राहता राष्ट्रवादी व भाजप यांच्यात लढली गेली. त्यात भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावून राष्ट्रवादीचा पराभव करताना मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी साखर साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना निवडून आणून स्थानिक आमदार केले. पण या लढतीत राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांनी घेतलेली मते देखील लक्षवेधक ठरली आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक आमदार नसल्यामुळे या मतदारसंघाचा विकास व पाण्याचा प्रश्न रखडला आहे. ही तक्रार आता  अवताडे यांना सोडवावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com