हे मात्र भारीच....खुद्द सरपंचाचे स्वतःच्याच विरोधात मतदान - Irla Grampanchayat Sarpanch voted Against Himself | Politics Marathi News - Sarkarnama

हे मात्र भारीच....खुद्द सरपंचाचे स्वतःच्याच विरोधात मतदान

मनोज भिवगडे
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

ईरला येथील सरपंच सविता भास्कर सरोदे यांच्यावर इतर सदस्यांनी मिळून तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यात सरपंचावर स्थानिक समस्यांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, सरपंच पती ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करतात, सरपंच आणि त्यांचे पती हे सदस्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक देतात, असे आरोप ठेवण्यात आले होते

चांडोळ (जि. बुलडाणा)  : बुलडाणा तालुक्यातील ग्राम ईरला येथील सरपंच सविता भास्कर सरोदे यांच्याविरुद्ध शून्य विरुद्ध आठ मतांनी अविश्‍वास प्रस्ताव संमत झाला आहे. खुद्द सरपंचांनी स्वतःच्याच विरोधात मतदान केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

ईरला येथील सरपंच सविता भास्कर सरोदे यांच्यावर इतर सदस्यांनी मिळून तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यात सरपंचावर स्थानिक समस्यांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, सरपंच पती ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करतात, सरपंच आणि त्यांचे पती हे सदस्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक देतात, असे आरोप ठेवण्यात आले होते. 

ग्रामपंचायत सदस्य अशोक उत्तम वाघ, मनीषा भरत बाहेकर, संगीता अवचितराव वाघ, ज्योतिबाई सुपडा खरात, अरुणा दिपक मुरहाडे आणि दिनकर शेषराव म्हस्के या सदस्यांनी मिळून सरपंचावर अविश्वास दाखल करण्याची तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालय ईरला येथे सरपंच आणि उर्वरित सात सदस्यांना सोमवारी (ता. ७) हजर राहण्याच्या सूचना प्रभारी तहसीलदार तथा अध्यासी अधिकारी श्री. पवार यांनी दिली होती. तेव्हा सरपंच यांनी गुप्त मतदान घेण्याचे सांगितले. त्यावेळी मंडळ अधिकारी श्री. टेकाळे, सचिव बोबळे, तलाठी देठे, पोलिस पाटील उपस्थित होते. तसेच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता.

गुप्त मतदानानंतर सर्वांनच बसला धक्का
अविश्वास ठराव संमत करताना अध्यासी अधिकारी श्री. पवार यांनी सर्व सदस्यांना मतदान करण्याची पद्धत सांगितली. परंतु गुप्त मतदान करतेवेळी सरपंच यांनी स्वतः विरुद्ध मतदान केले. त्यामुळे शुन्य विरुद्ध ८ असा अविश्वास ठराव पारित करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ यांनी निकालबद्दल आश्चर्य व्यक्त केले. जणू परिसरातील ही पहिलीच घटना असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख