Warning to 40 villages in Mulshi taluka | Sarkarnama

मुळशीतील 'या' वाडया, वस्‍त्‍यांना सावधानतेचा इशारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 जून 2020

मुळशी तालुक्‍याच्‍या पश्चिम पटटयातील ४४ गावे, वाडया-वस्‍त्‍यांतील नागरिकांना निसर्ग चक्रीवादळाच्‍या पार्श्‍वभुमीवर बुधवार (ता.३) व गुरुवार (ता.४) हे दोन दिवस सावधानतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

माले : मुळशी तालुक्‍याच्‍या पश्चिम पटटयातील ४४ गावे, वाडया-वस्‍त्‍यांतील नागरिकांना निसर्ग चक्रीवादळाच्‍या पार्श्‍वभुमीवर बुधवार (ता.३) व गुरुवार (ता.४) हे दोन दिवस सावधानतेचा इशारा देण्‍यात आला आहे. मुळशी धरणाचा हा परिसर आहे. तैलबैला, आडगाव,  सालतर, आसनवाडी, विसाघर, देवघर, पोमगाव, दत्तवाडी, शेडाणी, हिरडी, वांद्रे, गोठे, घुसळखांब, माजगाव, आंबवणे, तिस्करी, भांबर्डे, बार्पे, पेठशहापूर, आहेरवाडी, सुसाळे, एकोले, घुटके, दावडी या गावांसह परिसरातील गोणवडी, पळसे, चाचिवली, ताम्हीणी, निवे, पिंपरी, वडुस्ते, आदरवाडी, सारोळे,  वाघवाडी, मोहरी, पोमगाव, चांदिवली, नांदिवली, कुंभेरी, वारक, ढोकळवाडी, शिरगाव, वडगाव, वळणे गावांना, वाडया वस्‍त्‍यांना सावधानतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

कोकण हददीजवळील या पटटयात पावसाचे मोठे प्रमाण असते. मंगळवार (ता.२) संध्‍याकाळपासून या परिसरात वा-यासह जोराचा पाऊस सुरु झाला आहे. कोकण हददीजवळील  हा परिसर असल्याने असल्‍याने या परिसरात वा-याचा वेग जोरात असण्‍याची शक्‍यता आहे. हा परिसर अत्‍यंत दुर्गम व डोंगराळ आहे. या गावांमध्‍ये दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे.  पावसाचे मोठे प्रमाणही या भागात जास्त असते. बहुसंख्‍य छोटी पत्र्याची घरे आहेत. पाळीव जनावरांचे गोठे आहेत. गावे लांब-लांब अंतरावर आहेत. अनेक वाडया-वस्‍त्‍या डोंगरात आहेत. त्‍यामुळे  मदत पोचणे अवघड होते. सावधानता बाळगणे हाच उत्‍तम उपाय आहे.  

तहसील कार्यालय मुळशी, स्‍थानिक ग्रामपंचायतींच्‍या माध्‍यमातून निसर्ग चक्रीवादळा बाबत जागरूक करुन, ग्रामस्‍थांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात येत आहे. मोडकळीला आलेल्‍या इमारती, पत्र्याच्‍या घरांतील नागरीकांनी जीवित अथवा वित्त हानी होणार नाही. यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. 

'निसर्ग वादळाच्‍या पार्श्‍वभुमीवर मुळशी धरण भागातील नागरीकांनी येते दोन दिवस सजग राहणे गरजेचे आहे. धोकादायक घरे, पत्र्याचे शेड-घरे यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी जवळील शाळा किंवा सरकारी इमारतीमध्ये आश्रय घ्यावा. गावांमध्ये असलेले जेसीबी तथा पोकलेन मालकांनी आपत्तीच्या काळामध्ये प्रशासन व जनतेस मदत करण्यासाठी तत्‍पर राहावे.' असे आवाहन मुळशीचे तहसीलदार अभय चव्‍हाण यांनी केले आहे. विद्युत तारांखाली उभे राहु नये. पोलला जनावरे बांधू नये. तारा, डीपी, पोल यांपासून लांब राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

हेही वाचा : आपत्कालीन मदत कर्ज योजना कृतीशीलपणे राबवा : सतेज पाटील

कोल्हापूर : कोव्हिड 19 च्या संकटामुळे जिल्ह्यातील जे उद्योग धंदे ठप्प झाले आहेत, त्यांना "माझं कोल्हापूर माझा रोजगार' या मोहिमे अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत आपत्कालीन मदत कर्ज योजना बॅंकांमार्फत कृतीशीलपणे राबवावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य सेवक, डॉक्‍टर्स, स्वच्छता सेवक यांच्या बरोबर गेल्या दोन महिन्यांपासून कोव्हिड-19 च्या आपत्कालीन काळामध्ये आवश्‍यक सेवांमध्ये बॅंका येत असल्याने जिल्ह्यातील सर्व कार्यरत बॅंकांनी ज्या पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या तक्रारी उद्भवू न देता ग्राहकांना आवश्‍यक सेवा व्यवस्थितरित्या उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल 'कोविड वारियर्स' अशा शब्दात पालकमंत्र्यांनी बॅंकांचाही गौरव केला. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बॅंकांची आज अग्रणी जिल्हा बॅंके मार्फत बैठक झाली. पालकमंत्र्यांनी मुंबई येथून सर्व बॅंकांशी संवाद साधला. यामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने सहभागी झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख