सांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यापुढे अखेर आमदार असं बिरुद लागलं... असं अरुण लाड यांच्या बाबतीत म्हणता येईल. गेली चौदा वर्षे ते पुणे पदवीधर मतदारसंघात ते तयारी करीत होते. आज त्यांच्या परिश्रमाला यश आले. कुंडलच्या लाडांच्या घरात तब्बल ५८ वर्षानंतर आमदारकी आली.
स्वातंत्र्यपूर्व काळात सशस्त्र सेना उभी करून ब्रिटीशांशी लढणाऱ्या जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्यानंतरही शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून व्यवस्थेविरोधात सतत संघर्ष केला. त्यांचे पुत्र असलेल्या अरुण यांच्या वाट्यालाही तोच संघर्ष आला आणि तो फळास आला. गतवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विजयी झाले ते लाड यांनी स्वबळावर ३७ हजार मतांमुळे. त्यांच्या या मतांमुळेच राष्ट्रवादीला त्यांच्या तयारीची जाणीव झाली. राष्ट्रवादीने यंदा त्यांच्या गळ्यात महाविकास आघाडीची उमेदवारी टाकून त्यांच्या आधीच्या तयारीला हत्तीचे बळ दिले.
या विजयाच्या निमित्ताने लोप्रोफाईल लाड प्रथमच राज्याच्या राजकीय नकाशात आले आहेत. खरे तर त्यांचे अंडरग्राऊंड काम खूप आधीपासूनचे. क्रांती उद्योग समूहातील प्रत्येक संस्था त्यांनी नेटाने चालवली आहे. राजकीयदृष्ट्या त्यांनी कधी स्वतःला कधीच प्रोजेक्ट केले नाही. सकाळी सांगलीतून घरूनच जेवणाचा डबा घेऊन क्रांती कारखान्यावर सकाळी आठला रेल्वेने हजर राहत त्यांनी कारखाना उभा केला. सचोटीने चालवला. साखर, कारखाना, बॅंक, दुध संघ, पाणी सोसायट्या अशा सहकारातील विविध संस्थांचे जाळे त्यांनी विस्तारले. जे आजच्या काळात दुर्मिळ आहे. आजवर राजकीयदृष्ट्या त्यांना फारशी संधी मिळाली नाही तरीही त्यांनी कधी त्याबद्दल खंत व्यक्त केली नाही.
त्यांचा पासंग म्हणून मदत घेत शिडी करीत अनेकांनी सत्ता चाखली. बारा वर्षे म्हणजे तपभर ते पदवीधर मतदारसंघासाठी तपश्चर्या करीत होते. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचे पर्व म्हणजे एक सोनेरी पान. या पर्वातील अग्रदूत व तुफान सेनेचे सेनापती क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव. त्यांनी वडिलांची कीर्ती न सांगता सक्रिय समाजकारणात उद्योग समूहाचा वटवृक्ष उभारला.
सन १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे राज्यात ६२ आमदार विजयी झाले. त्यात जी. डी. बापू होते. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, डाव्या विचाराची धुरा खांद्यावर घेत बापूंनी प्रदीर्घकाळ कॉंग्रेसविरोधी काम केले. १९६२ मध्ये बापू पुन्हा विधानपरिषदेवर गेले. आता त्याच सभागृहात पुन्हा त्यांचे बापूंचे ज्येष्ठ चिरंजीव अरुण लाड गेले आहेत.
अॅग्री पदवीधारक लाड यांनी वीस वर्षांत ५७ विधानसभा मतदारसंघात पदवीधर नोंदणीचे नेटवर्क उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. राष्ट्रवादीने त्यांना दोनदा थांबविले. गतवेळी डावललं तेव्हा त्यांनी स्वभावाला मुरड घालत लढायचा निर्णय घेतला. आणि पक्षनेत्यांना आपली तयारी दाखवली.
अर्थात पक्षाचे नेते शरद पवार यांनी स्वत:च एका कार्यक्रमात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई केली जाईल, असे म्हटले होते. तो शब्द पाळला आहे. नियती अशी, की ज्यांच्या पारड्यात त्यांनी राजकीय ताकदीचा पासंग टाकला आणि पुढे चाल दिली. त्या कडेपूरच्या देशमुखांशी त्यांना लढावे लागले. ही सर्वात कठीण परीक्षा ते पैकीच्या पैकी मार्क घेऊन पास झाले.
Edited By - Amit Golwalkar

