विजयाचा गुलाल उधळल्यानंतर हाती पडली टपाली मतपत्रिका  - Postal ballot papers received on the day of result in Gram Panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

विजयाचा गुलाल उधळल्यानंतर हाती पडली टपाली मतपत्रिका 

रमेश वत्रे 
मंगळवार, 19 जानेवारी 2021

भावजयीला मतदान करू न शकल्याची खंत शिंदे यांना बोचत आहे.

केडगाव (जि. पुणे) : ग्रामपंचातीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. पण, टपाली मतपत्रिका मतदानानंतर म्हणजे 18 जानेवारीला मतमोजणीच्या दिवशी मिळाल्या. त्यामुळे दौंड तालुक्‍यातील पारगाव येथील दोघांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. 

राजाराम शिंदे (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) व आबासाहेब आभाळे (रा. नगर) हे पारगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षक आहेत. त्यांच्या मतदान पत्रिका सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पारगाव येथील शाळेत पोचल्या होत्या. आभाळे व शिंदे यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाल्याने त्यांना टपाली मतदान करायचे होते. 

दौंड तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या प्रशिक्षण दरम्यान त्यांनी टपाली मतदानाचे प्रक्रिया पार पाडली होती. या प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना त्यांच्या शाळेत टपाली मतपत्रिका टपालाने मिळणार होत्या. प्रक्रिया पार पाडून अनेक दिवस झाले तरी मतपत्रिका आली नसल्याने शिंदे व आभाळे यांनी याबाबत दौंड येथे निवडणूक शाखेत चौकशी केली होती. मात्र, प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तुम्हाला टपालाने मतपत्रिका मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले होते. 

निवडणुकीच्या व्यस्त दिनक्रमामुळे शिंदे व आभाळे यांना मतपत्रिकेचा जास्त पाठपुरावा करता आला नाही. पण, या दोघांना सोमवारी दुपारी चक्क मतमोजणीच्या दिवशी मतपत्रिका पारगाव येथील शाळेत मिळाल्या. 

मतदान झाले, मतमोजणी झाली, विजयाचा गुलालही उधळला गेला. आणि त्यानंतर मतपत्रिका मिळतात हे पाहून शाळेतील सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. 

शिंदे यांच्या भावजय रोहिणी शिंदे या गोपाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार होत्या. त्या विजयी झाल्या आहेत. भावजयीला मतदान करू न शकल्याची खंत शिंदे यांना बोचत आहे. मात्र, याला जबाबदार कोण? निवडणूक यंत्रणा की टपाल यंत्रणा बाबत चौकशी होण्याची मागणी करण्यात येत आहे. टपालाच्या पाकीटावर 12, 15 व 18 तारीख असे तीन शिक्के आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख