...अशा जित्राबांना आता राष्ट्रवादीत प्रवेश नाही : अजित पवार 

त्यांचा पायगुणच तसा आहे.
Deputy Chief Minister Ajit Pawar's criticism on Appasaheb Jagdale
Deputy Chief Minister Ajit Pawar's criticism on Appasaheb Jagdale

इंदापूर : "राष्ट्रवादी पक्षाने आपणास पद देऊन मोठे केले आहे. जिल्हा बॅंक, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद अशी पदे जनतेची व शेतकऱ्यांची कामे करण्यासाठी दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजूस ठेवून विरोधकांचे काम केले. ते जिकडे जातील, तिकडचा पराभव होतो, त्यांचा पायगुणच तसा आहे. अशा जित्राबांना आता पक्षात प्रवेश नाही,'' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचे नाव न घेता टीका केली. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या इंदापूर विभागीय कार्यालय तसेच जुन्या पुणे सोलापूर महामार्गावरील बॅंकेच्या नूतन शाखेचे उदघाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे हे होते. 

अजित पवार म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत काहीजण तिकडंच गेलीत. त्यांचा पायगुण असा की त्यांची सत्ताच गेली आणि आमची सत्ता आली. आता असली जित्राबं आपल्याला नकोच. ह्यांनी कितीही होय म्हणू द्या. मी नाहीच घ्यायचं म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका. नाहीतर तुम्ही.. "तुम कुश्‍ती करो, हम कपडे संभालते है!' असं नाही झालं पाहिजे.'' 

"आता आपल्याला नवीन टीम तयार करायचीय. मला पण 30 वर्षे राजकारणाला झालीत. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. आताही आपण तरुणांची टीम तयार करू. तुम्ही काहीही काळजी करु नका. फक्त निर्व्यसनी रहा. चांगली कामे करा. ह्या बोटाची थुंकी त्या बोटाला लावू नका. टोप्या फिरवू नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठेने राहा. आपण फार चांगल्या पद्धतीने काम करू,'' असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला. 

या वेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांकडे पाहून तुम्ही सर्वांनी एकजुटीने काम केले असते, तर बारामतीप्रमाणे विरोधकाचे अनामत रक्कम जप्त झाले असते, असा चिमटाही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेतला. 

"सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे राजकारणात मंत्री म्हणून नवखे जरूर आहेत. मात्र, विकास कामांचा पाठपुरावा करण्याची चिकाटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे खेचून आणली आहेत. तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे काम असे करा की विरोधकांचे अस्तित्वच तालुक्‍यात रहाणार नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले. मात्र, पवारसाहेबांच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बसणाऱ्या नेत्याने पक्षविरोधी काम केल्यामुळे वालचंदनगर ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आली नाही. इथून पुढे असे चालणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com