BJP Leader Raoseheb Danve Working in Field at Bhokardan | Sarkarnama

रावसाहेब दानवेंनी औत हाणले, गाईची धारही काढली!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 जून 2020

सोशल मीडियावर पांढरा कुर्ता पायजामा आणि डोक्याला बांधलेले पांढरे उपरणे अशा अस्सल शेतकरी पेहरावात औत हाणतानाचे  भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

औरंगाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील शेतकरी जागा झाल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे सर्वत्र शेतीच्या मशागतीची आणि पेरणीची लगबग सुरू आहे. लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या वाऱ्या सध्या बंद असल्याने रावसाहेब दानवे सध्या तळणीच्या शेतात रमले आहेत. अगदी शेतात औत हाणण्यापासून गाईची धार काढण्यापर्यंतची सगळी कामे दानवे करताना दिसत आहेत. 

'एवढी तूर खरेदी केली तरी रडतात साले' असे वादग्रस्त विधान करत राज्यातील समस्त शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मुळात शेतकरी आहेत. लॉकडाऊन मुळे मिळालेला वेळ सध्या ते आपल्या शेतीतील कामे करण्यात घालवत आहेत.  

सोशल मीडियावर पांढरा कुर्ता पायजामा आणि डोक्याला बांधलेले पांढरे उपरणे अशा अस्सल शेतकरी पेहरावात औत हाणतानाचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.केवळ औत चालूनच रावसाहेब दानवे थांबले नाही तर गाईची धार काढत आपण कसे पक्के शेतकरी आहोत हे देखील त्यांनी दाखवून दिले.

रावसाहेब दानवे हे आपल्या ग्रामीण शैली आणि भाषेसाठी ओळखले जातात. त्यांच्या ग्रामीण भाषेतील भाषणावरून अनेकदा वाद आणि गैरसमज देखील पसरले आहेत. परंतु, मी माझी भाषा आणि राहणी कुणासाठीही बदलणार नाही, असा पवित्रा दानवे यांनी वेळोवेळी घेतला आहे. 

शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेले रावसाहेब दानवे हे पूर्वीपासून शेती कामांमध्ये निष्णात आहेत.अगदी गाईच्या गोरह्याचे दात मोजून, तो कामाला कधी येणार याचा अंदाज देखील रावसाहेब दानवे अचूक बांधतात. या संदर्भातील त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर खूप गाजले आहेत.

त्यामुळे भोकरदनला असले की, रावसाहेब दानवे आपल्या तळणीच्या शेतावर गेल्याशिवाय आणि तिथे काम केल्याशिवाय राहत नाहीत. कधी बैलगाडी हाकत तर कधी घोड्यावरुन सैर सपाटा करण्याची दानवे यांना भारीच हौस आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने पुन्हा एकदा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शर्टाच्या बाह्या सरसावत शेतीच्या मशागतीची कामे केली. त्यांच्या या शेतीप्रेमाचे समर्थकांकडून कौतुक केले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख