सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील पक्षनेते अण्णाराव बाराचारी यांची एक वर्षांची मुदत संपली आहे. या पदावर बार्शीतील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांची नियुक्ती करण्यासंदर्भात आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
आमदार परिचारक आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देणार आहेत. त्यानंतर प्रदेश भाजपकडून जिल्हा परिषदेतील पक्ष नेत्याचे नाव जाहीर होणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या एका गटाची मदत घेत भाजपने सोलापूर झेडपीवर वर्चस्व राखलेले आहे. मागील वेळी पक्षनेता निवडताना झालेला वाद टाळण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. पक्षाची जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची सांगोला येथे बैठक झाली. त्या बैठकीत आमदार परिचारक यांची समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदाचा वाद मागील वर्षी मोठा चर्चेत आला होता.
तत्कालिन पक्षनेते आनंद तानवडे यांना हटवून त्या जागी बाराचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षनेते पदासाठी होणारा वाद, चर्चा टाळण्यासाठी भाजपने आता समिती नियुक्तीचा पर्याय शोधला आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षनेतेपद बार्शी तालुक्याला देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यानुसार आता परिचारक यांची समिती तसा अहवाल प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे पाठवणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जिल्हा परिषदेला नवीन पक्षनेता मिळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

