तुम्ही फक्त आवताडेंना निवडून द्या; बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो - You choose Samadhan Avtade; I do the rest of the correct program : Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

तुम्ही फक्त आवताडेंना निवडून द्या; बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो

हुकूम मुलाणी
सोमवार, 12 एप्रिल 2021

लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, त्याच पद्धतीची सरकारची भूमिका आहे.

मंगळवेढा  (जि. सोलापूर)  ः महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली आणि शिवसेनेने जळगाव महापालिकेत केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात ताजी आहे. असे असतानाच आज (ता.१२ एप्रिल) भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे बोलताना ‘‘तुम्ही भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा. उर्वरित करेक्ट कार्यक्रम मी करतो, त्याची चिंता करू नका,’’ असे वक्तव्य केल्याने राज्यात पुन्हा यानिमित्ताने सत्ताबदलाची चर्चा सुरू झाली आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा येथे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, सुभाष देशमुख, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत, राम शिंदे, लक्ष्मण ढोबळे, भाजपचे उमेदवार आवताडे, बाळा भेगडे, चित्रा वाघ, श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, सुरुवातील हे महाविकास आघाडी सरकार होते, एका वर्षात महाविनाश आघाडी सरकार झाले; परंतु आता हे सरकार महावसुली आघाडी सरकार झाले आहे. त्यामुळे पोलिस, सामान्य माणूस, शेतकऱ्याकडून जिथे मिळेल तिथे वसुली करण्याचा सपाटा लावला आहे. कोरोनाच्या संकटात वीजबिल वसूल केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही काम बंद आंदोलन केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन वीज बिल वसुली स्थगितीचा आदेश दिला. पण, अधिवेशन संपताच वसुलीबाबत त्यांनी पुन्हा आदेश दिले. या सरकारने शेतकऱ्याकडून जवळपास पाच हजार कोटी वसुली केले आणि बिल्डरांना पाच हजार कोटींची सवलत दिली. 

मोदी सरकारच्या काळात जलसिंचनासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पोटनिवडणुकीनंतर वीज तोडणीची मोहीम सुरू केली जाणार आहे. पंधरा वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याला आलेल्या निधीपेक्षा जास्तीचा निधी मागील पाच वर्षाच्या काळात दिला आहे. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, त्याच पद्धतीची सरकारची भूमिका आहे. तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या. तालुक्यातील 35 गाव उपसा सिंचन योजनेसाठी या राज्य सरकारने निधी नाही दिला तर मी थेट मोदी सरकारकडून निधी उपलब्ध करतो. 

आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की अनैसर्गिक सरकारच्या विरोधात सध्या जनतेत आक्रोश आहे. या सरकारच्या विरोधातील ही लढाई आहे, त्यामुळे गट बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करून आवताडे यांना संधी द्यावी. फक्त निवडणुकीपुरती सुरू असणारी भोसे प्रादेशिक योजना आज बंद असल्यामुळे लोकांना दक्षिण भागात पाणी पाणी करावे लागत आहे. नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असतानाही पक्षपात न करता पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. 

दामाजी कारखान्याच्या कोणत्याही सभासदांना कमी केले जाणार नाही. माझ्या विरोधात अपप्रचार केला जात आहे. या मतदार संघातील विकास, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संधी देण्याचे आवाहन समाधान आवताडे यांनी या वेळी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख