शिक्षक मतदारसंघात पक्ष-संघटनांसमोर बंडखोरांचे आव्हान - Rebels posed challenge in Pune Teachers Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

शिक्षक मतदारसंघात पक्ष-संघटनांसमोर बंडखोरांचे आव्हान

जयसिंग कुंभार
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात प्रस्थापित पक्षसंघटनांसमोर बंडखोरांचे आव्हान असेल. येत्या एक डिसेंबरला निवडणूक आहे मात्र अजूनही मतदारसंघातील मात्तबर शिक्षण संस्था व नेते मंडळींच्या भूमिका स्पष्ट नाहीत. अर्जमाघारीची मुदत संपली तरी अजूनही पडद्याआड माघार, पाठिंब्याच्या हालचाली सुरु आहेत.

सांगली :  पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात प्रस्थापित पक्षसंघटनांसमोर बंडखोरांचे आव्हान असेल. येत्या एक डिसेंबरला निवडणूक आहे मात्र अजूनही मतदारसंघातील मात्तबर शिक्षण संस्था व नेते मंडळींच्या भूमिका स्पष्ट नाहीत. अर्जमाघारीची मुदत संपली तरी अजूनही पडद्याआड माघार, पाठिंब्याच्या हालचाली सुरु आहेत.

या मतदारसंघात भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आमदार भगवानराव साळुंखे यांनी बाजी मारल्यानंतर भाजप-संघ परिवाराला प्रथमच यश मिळाले. अर्थात विनाअनुदानिक शिक्षक संघटनेच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले. त्यांनी राज्यव्यापी अशी ही संघटना बांधली. या संघटनेतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या दत्तात्रय सावंत यांनी गतवेळी बंडखोरी करीत विजय मिळवताना सर्वांनाच चकवा दिला. मजबूत संघटना बांधणीतून त्यांनी पाचही जिल्ह्यात शिक्षणसंस्थाचे बळकट जाळे असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धक्का दिला होता. 

त्यानंतर पाच वर्षे भाजप काळात एकला चलोरे भूमिका घेणाऱ्या आमदार सावंत यांनी राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादीशी घरोबा वाढला होता. त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जागा मिळावी असे प्रयत्नही केले होते. सावंत आता अपक्ष असले तरी ते 'मला साहेबांचा आशिर्वाद आहे' असे सांगतात. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही जागा आग्रहाने आपल्याकडे कायम ठेवताना जयंत आसगावकर यांना महाआघाडीची उमेदवारी देऊन ही जागा जिंकण्याचा विडाच उचलला आहे.

संघ परिवारातील शिक्षक परिषदेची उमेदवारी सहा महिने आधीच जाहीर झाली आहे. सोलापूरचे जितेंद्र पवार यांनी तेव्हापासूनच जोरदार तयारी केली आहे. सोलापूर हे त्यांचे होमग्राऊंड त्यांच्यासाठी आधार असेल मात्र तिथलेच आमदार सावंत रिंगणात आहेत. आता राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले सोलापूरचे नेते विजयसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेतात याबद्दलही कुतूहल असेल. कारण गतवेळी सावंत यांच्या मागे त्यांनी नेटाने ताकद लावली होती.

पुरोगामी समाजवादी परिवारातील एकेकाळची ताकदीची संघटना असा लौकीक असलेलया शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) तर्फे यावेळी पुण्याचे जी.के.थोरात लढत आहेत. त्यांनी आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. टीडीएफचे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. थोरात हे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीच्या गोतावळ्यातील उमेदवार मानले जातात.

पुणे विभागात भक्कम संस्थात्मक जाळे असलेल्या विवेकानंद, रयत आणि भारती या दोन शिक्षण संस्था आहेत. या संस्थाचे उमेदवार म्हणूनही काही मंडळी दरवेळी रिंगणात असतात. काही वेळा त्यात त्यांना यशही मिळते. माजी आमदार जी.के.ऐनापुरे यांनी विवेकानंदच्या ताकदीच्या बळावर यश मिळवले होते. यावेळी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी रेखा यांनी आपली उमेदवारी विवेकानंदची असल्याचा दावा करीत प्रचार सुरु केला आहे. त्यांच्यासाठी संस्था पातळीवर दोन झुम मिटिंगही झाल्या. मात्र संस्थेचे सर्वेसर्वा प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. 

या संस्थेतील प्रा.राजेंद्र कुंभार हेही सध्या रिंगणात आहेत. रयत शिक्षण संस्थेने गतवेळी मोहन राजमाने यांच्यासाठी ताकद लावली होती. यावेळी रयत परिवारातून अधिकृत अशी कोणतीही भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक पतसंस्थेच्या माध्यमातून आपली ताकद सिध्द केलेल्या दादासाहेब लाड यांनी कॉंग्रेससाठी माघार घेतली आहे. जैन पदवीधर संघटना ही या मतदारसंघातील आणखी एक प्रभावशाली संघटना आहे. जी.के.ऐनापुरे, प्रा. शरद पाटील यांच्या तत्कालीन विजयात या संघटनेच्या शिस्तबध्द कामाचा वाटा होता आता पुन्हा एकदा प्रा.पाटील पदवीधरच्या रिंगणात आहेत. त्यांची शिक्षकमध्ये कोणासोबत युती याचा निर्णय नाही.

खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील यांनी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे तिकीट नाकारलेल्या महाराष्ट्र प्रदेश शिक्षक कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सुजाता माळी यांनी त्यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. शिक्षक मतदारसंघात पस्तीस उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे निरंतर संघटन काम आणि पक्षीय ताकदीच्या बळावरच मतदारांपर्यंत पोहचता येणार आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसात उमेदवारांना जीवाचे रान करावे लागेल.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख