पायलटच्या सीटवर राजीव प्रताप रुडी; प्रवाशांमध्ये प्रफुल्ल पटेल! - Praful Patel Traveled in a plane Piloted by Rajiv Pratap Rudy | Politics Marathi News - Sarkarnama

पायलटच्या सीटवर राजीव प्रताप रुडी; प्रवाशांमध्ये प्रफुल्ल पटेल!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

इंडिगोची फ्लाईट क्र. ६ई- १७९ आज मुंबईच्या विमानतळावरून गोव्याच्या दिशेने झेपावली आणि विमानात घोषणा झाली की मी सह कप्तान राजीव प्रताप रुडी, सह कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवाशांचे या विमानात स्वागत करतो. आपला प्रवास ३० मिनिटांचा आहे. राजीव प्रताप रुडी हे नाव ऐकल्यानंतर प्रवाशांचा भुवया उंचावतात....

पणजी : मुंबई ते गोवा हा  भर दुपारचा विमान प्रवास. विमानाचे सारथ्य करीत होते माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राजीव प्रताप रुडी तर विमानातील प्रवाशांत होते माजी केंद्रीय वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल. रुडी यांनी अर्ध्या तासात दिलेली रंजक माहिती आणि पटेल यांचे कॉकपीटबाहेर येऊन केलेले स्वागत यामुळे या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी हा विमान प्रवास संस्मरणीय ठरल्यास नवल ते कोणते.

इंडिगोची फ्लाईट क्र. ६ई- १७९ आज मुंबईच्या विमानतळावरून गोव्याच्या दिशेने झेपावली आणि विमानात घोषणा झाली की मी सह कप्तान राजीव प्रताप रुडी, सह कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवाशांचे या विमानात स्वागत करतो. आपला प्रवास ३० मिनिटांचा आहे. राजीव प्रताप रुडी हे नाव ऐकल्यानंतर प्रवाशांचा भुवया उंचावतात. हे नाव कुठेतरी ऐकले आहे असे त्यांना वाटू लागते. त्यांनी इंटरनेटवर शोध घेतल्यावर रुडी हे माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी असल्याचे त्यांना समजते. हा आश्चर्याचा धक्का ते पचवत असतात तोच आणखीन एक घोषणा विमानात झाली.

विमानात आज एक खास प्रवासी प्रवास करत असून त्यांचे नाव प्रफुल्ल पटेल असे आहे. ते देशाचे माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री आहेत. त्यांच्या काळात त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे देशात हवाई वाहतुकीचा विस्तार होण्यास मदत झाली होती. त्यांचे आम्ही या विमानात स्वागत करतो अशी ती घोषणा होती. त्यांच्या सांगण्यात खिलाडूवृत्ती होती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा आणखीन एक धक्का बसला. विमानाचे सारथ्य एका माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्याकडे तर दुसरा माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रवासी असा हा योगायोग होता.

रुडी यांनी कॉकपिटबाहेर येऊन पटेल यांचे विमानात स्वागत केले. अगदी आस्थेने त्यांची विचारपूस केली. रुडी यांनी प्रवासातील ३० मिनिटात वाटेत लागणारी शहरे त्यांचे वैशिष्टे यांची माहिती तर दिलीच याशिवाय विमानाबाहेरील तापमान वजा वीस अंश सेल्सिअस असून असे तापमान असणारे कोणते भाग जगभरात आहेत याची महत्वपूर्ण माहितीही दिली. विमानाचा वेग ४०० नॉट (७४० किलोमीटर प्रती तास) आहे असे सांगातानाच त्यांनी नॉट हे परीमाण कधीपासून वापरात आले, नॉट म्हणजे काय, नॉटचे रुपांतर किलोमीटरमध्ये केल्यास किती होते याची नेमकेपणाने पण सरळ साध्या सोप्या शैलीत माहिती दिली.

रुडी यांचे रसाळ निवेदन, दोन माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांची उपस्थिती यामुळे तीस मिनिटांचा हा प्रवास कधी संपला हे प्रवाशांना समजले तर नाहीच, याउलट तो प्रवास संस्मरणीय ठरला. विमानातून बाहेर पडण्यापूर्वी पटेल यांनी कॉकपीटमध्ये जात दोन्ही पायलटांचे सुरक्षित हवाई प्रवासाबद्दल अभिनंदन केले. पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोव्यातील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले आहेत. येत्या दीड वर्षावर आलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोव्यातील उड्डाणाचे सारथ्य पटेल कसे करतात याविषयी आता उत्सुकता आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख