बंटी किती चॅप्टर आहे ते दादांना विचारा... - Ligh Moment of Disucssion between Hassan Mushriff Supriya Sule Satel Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

बंटी किती चॅप्टर आहे ते दादांना विचारा...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

सर्किट हाऊस येथून काल राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा गेल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात टोलेबाजी रंगली. या टोलेबाजीने कार्यकर्त्यांची हसून हसून पुरेवाट झाली.

कोल्हापूर  : सर्किट हाऊस येथून काल राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा गेल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात टोलेबाजी रंगली. या टोलेबाजीने कार्यकर्त्यांची हसून हसून पुरेवाट झाली. या तिन्ही नेत्यांनी खेळीमेळीत केलेली ही टोलेबाजी मात्र पुढे बराच वेळ सर्किट हाउसवर चर्चेचा विषय ठरली.

जिल्हा परिषदेत उभारलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण आज (ता. २२) शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. यासाठी श्री. पवार सपत्निक रात्री येथे दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बाहेर पडत असतानाच पालकमंत्री सतेज पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांचे सर्किट हाऊसवर आगमन झाले. मुंबई येथून एकाच विमानाने मंत्री पाटील व खासदार सुळे बेळगावात दाखल झाल्या. तेथून मंत्री पाटील यांच्या वाहनातूनच त्या कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे आल्या. दोघांचे आगमन होत असतानाच श्री. पवार बाहेर पुढील दौऱ्यासाठी बाहेर आले.

श्री. पवार यांना निरोप दिल्यानंतर मंत्री मुश्रीफ व खासदार सुळे यांच्यात संवाद सुरू होता. पालकमंत्री पाटील एका बाजूला थांबून या दोघांचा संवाद ऐकत होते. यावर मंत्री पाटील यांच्याकडे पाहून खासदार सुळे यांनी सतेज पाटील यांना दूर का उभे आहात, गर्दीत का हरवला आहे, अशी विचारणा केली. यावर मंत्री पाटील यांनी जवळ येऊन मुश्रीफ यांना नमस्कार करून मिश्‍किल हास्य करत, हे आमचे मोठे भाऊ आहेत, असे सांगितले. यावर खासदार सुळे यांनी सतेज पाटील यांच्याकडे बोट दाखवत हे आमचे मुंबईपासूनचे केअरटेकर असल्याचे मुश्रीफ यांना सांगितले. हे ऐकताच मुश्रीफ यांनी, सतेज पाटील यांना उद्देशून 'तो, लय चॅप्टर आहे,' असा टोला लगावला. मंत्री मुश्रीफ यांनी अनपेक्षितपणे लगावलेल्या टोल्याने सर्वत्रच एकच हशा पिकला.

मंत्री मुश्रीफ यांच्या टोल्याचा धागा खासदार सुळे यांनी पकडत मुश्रीफसाहेबांनी तुमच्याबद्दल किती चांगल्या कॉम्प्लीमेंण्ट दिल्या आहेत. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे मला तुमचे व्यक्तिमत्त्व कळले, असा चिमटा सतेज पाटील यांना काढल्याने पुन्हा एकदा हशा पिकला. या हास्यातून सर्वजण सावरण्यापूर्वीच मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा फटका लगावला. बंटी किती चॅप्टर आहे, ते दादांना (अजितदादा) विचारा, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक कळेल, असे सांगताच खासदार सुळे, मंत्री पाटील यांच्यासह मुश्रीफ व कान देऊन ऐकत असलेले कार्यकर्त्यांनाही हसू आवरता आले नाही.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख