काय सांगता? पोलिसांनी अरुण गवळीला पकडण्यासाठी नेमला होता दूधवाला भैय्या आणि पेपरवाला?

अरुण गवळी आणि दावूद इब्राहिमचे वैर सर्वश्रूत आहे. या गवळीनं एकेकाळी मुंबई पोलिसांच्या नाकी दम आणला होता. खून, खंडण्यांनी मुंबई हैराण झाली होती. पोलिस त्याला पकडायचा प्रयत्न करत होते. पण 'अभेद्य' अशी भायखळ्यातली कुप्रसिद्ध दगडी चाळ पोलिसांना गवळीपासून दूरच ठेवत होती. पण तरीही मुंबई पोलिसांनी गवळीवर हात टाकलाच. तो कसा याचे सविस्तर वर्णन मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या 'लेट मी से इट नाऊ' या आत्मचरित्रात दिले आहे. या साऱ्या अटक नाट्यात बाॅलीवूडचा मसाला ठासून भरलाय. मारियांच्या पुस्तकातून साभार घेतलेले हे नाट्य 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी......
How Arun Gawali Arrested by Rakesh Maria's Team
How Arun Gawali Arrested by Rakesh Maria's Team

संपूर्ण देशात कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. सार्वजनिक कार्यक्रम, मोठी गर्दी करुन होणाऱ्या विवाह सोहोळ्यांना बंदी आहे. लोक मोजक्या आमंत्रितांच्या उपस्थितीत लग्न वगैरे पार पाडत आहेत. अशातच मुंबईत एक विवाह सोहोळा पार पडला. या विवाहासाठी वधूपिता खास 'पॅरोल' घेऊन औरंगाबादच्या हर्सुल कारागृहातून आला होता. विवाह सोहोळा पार पडल्यानंतर न्यायालयाने या वधूपित्याला पुन्हा 'लाॅकडाऊन' होण्याचा आदेश दिला. हा वधूपिता आहे अंडरवर्ल्ड डाॅन अरूण गवळी.....मुंबईच्या शिवसेना नगरसेवकाच्या खून प्रकरणात गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.....आज त्या निमित्ताने आठवण झाली ती गवळीला पोलिसांनी पकडलं कसं या घटनेची......काय आहे ही घटना...वाचा सविस्तर....

अरुण गवळी आणि दावूद इब्राहिमचे वैर सर्वश्रूत आहे. या गवळीनं एकेकाळी मुंबई पोलिसांच्या नाकी दम आणला होता. खून, खंडण्यांनी मुंबई हैराण झाली होती. पोलिस त्याला पकडायचा प्रयत्न करत होते. पण 'अभेद्य' अशी भायखळ्यातली  कुप्रसिद्ध दगडी चाळ पोलिसांना गवळीपासून दूरच ठेवत होती. पण तरीही मुंबई पोलिसांनी गवळीवर हात टाकलाच. तो कसा याचे सविस्तर वर्णन मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या 'लेट मी से इट नाऊ' या आत्मचरित्रात दिले आहे. या साऱ्या अटक नाट्यात बाॅलीवूडचा मसाला ठासून भरलाय. मारियांच्या आत्मचरित्रातून साभार घेतलेले हे नाट्य 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी......

२१ एप्रील २००८ चा दिवस. नुकतंच उजाडलं होतं. नागरिकांचे नित्याचे व्यवहार सुरु होते. अशातच काखोटीचा वर्तमानपत्रांचे बंडल घेतलेला पेपरवाला अजूनही जांभया देत असलेल्या 'त्या' चाळीच्या दरवाजातून आत शिरला. नित्याप्रमाणे दूधवालाही दुधाच्या पिशव्या घेऊन चाळीत अवतरला. इकडे हळूहळू चाळीतले स्त्री-पुरुष आपले जेवणाचे डबे घेऊन कामाला जाण्यासाठी बाहेर पडायला लागले होते. त्याचवेळी टपावर सामान लादलेली एक काळी-पिवळी टॅक्सी चाळीच्या दरवाजातून आत शिरली. आतमधून रात्रभर ट्रेनचा प्रवास करुन कंटाळलेलं एक जोडपं आळोखे पिळोखे देत खाली उतरलं. 

काही वेळातच पेपरवाल्याचे पेपर टाकून झाले. दूधवालाही काम संपवून खाली उतरतच होता. वाटेत दोघांची भेट झाली. थोडे हास्यविनोदही झाले. पाठीवरच्या थापांची देवाणघेवाण झाली आणि अचानक आपल्याला एक अर्जंट फोन करायचा असल्याचा साक्षात्कार पेपरवाल्याला झाला. तोवर मोबाईल फोन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले होते. त्याने आपल्या मोबाईलवरुन कुणाला तरी निरोप दिला. 

दोघे चाळीच्या दरवाजाच्या दिशेनं निघाले आणि आणखी एक मोटार आत शिरली. गाडी थांबताच पेपरवाल्याने गाडीचा दरवाजा उघडून दिला. दुसरीकडे बहुदा त्या दूधवाल्याला फारशी घाई-गडबड नसावी. कारण तो चाळीच्या आवारातच रेंगाळत होता. चाळीच्या आवारात थांबलेल्या मोटारीतून चार रुबाबदार माणसे खाली उतरली आणि लिफ्टच्या दिशेने जायला लागली. त्यांना ज्या व्यक्तीला भेटायचे होते ती व्यक्ती दुसऱ्या मजल्यावर होती.

चवथ्या मजल्यावरच्या एका खोलीत एक कृश अंगकाठीची जाडजूड मिशा असलेली व्यक्ती काळ्या कोटातल्या आपल्या दोन वकिलांशी चर्चा करत बसली होती. त्या व्यक्तीने आत आलेल्या चार अनोळख्या व्यक्तींकडे पाहिले. आपण यांना कुठेतरी पाह्यलंय याची त्या व्यक्तीला जाणीव झाली होती. काही वेळातच त्याला त्यांची ओळख पटली. याच चार जणांनी चौदा वर्षांपूर्वी या कृश व्यक्तीला, अरुण गवळीला शिवसेना आमदार रमेश मोरे यांच्या खून प्रकरणात अटक केली होती. काही आठवड्यांपूर्वी याच चौघांनी अरुण गवळीच्या भावाला विजयला अटक केली होती. 

...आणि खेळ संपला

आपला खेळ संपल्याची जाणीव गवळीला झाली. त्याने परवानगी घेऊन बाहेर जायचे कपडे अंगावर चढवले आणि तो या चौघांबरोबर खाली उतरला. तेवढ्यात चाळीतल्या महिला गोळा झाल्या आणि घोषणाबाजी करायला लागल्या. पण त्याचवेळी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं मोठं पथक 'त्या' चाळीत पोहोचलं होतं. पुढच्या काही वेळातच गवळीला पोलिसांनी गाडीत कोंबलं आणि पंधराव्या मिनिटाला ते सगळेजण 'पथ्थरवाली बिल्डिंग' म्हणवल्या जाणाऱ्या क्राईम ब्रँचच्या आॅफिसमध्ये पोहोचले होते. मारिया त्यावेळी आपल्या आॅफिसमध्येच होते. आपणासमोर नक्की अरुण गवळीच आहे ना याची खात्री करुन घेण्यासाठी त्यांना स्वतःला चिमटाही काढून पाहिला.  होय तो अरुण गवळीच होता. 

आता या नाट्यातल्या पात्रांचा परिचयही मारियांनी आपल्या आत्मचरित्रात करुन दिला आहे. यापैकी पेपरवाला बनले होते काँन्स्टेबल आसाम फारुकी, काँन्स्टेबल बागवे दूधवाल्याच्या भूमिकेत होते. पहिली टॅक्सी चाळीत आली त्या चाळीत एका महिला काँन्स्टेबलबरोबर होते काँन्स्टेबल अरुण आडम. या चौघांच्या पाळतीच्या सहाय्याने अरुण गवळीला ज्यांनी अटक केली ते होते सहाय्यक पोलिस निरिक्षक दिनेश कदम. त्यांच्याबरोबर होते क्राईम ब्रँचचे धनंजय दौंड, शिवाजी सावंत आणि काॅन्स्टेबल राजेंद्र रामदे. हे चौघे जण दगडी चाळीपासून दीडशे मीटर अंतरावर असलेल्या जेकब सर्कलजवळ थांबले होते. पेपरवाल्याच्या फोनची वाट पहात. त्या 'पेपरवाल्याने' म्हणजे काॅन्स्टेबल फारुकीने त्यांना फोनवर कळवलं होतं....दुसरे माले पे बैठा है. दो वकिल के साथ!

एका गुन्ह्यातून दुसरा गुन्हा उघडकीस

जमसंडेकर यांना मारण्याची तीस लाखाची सुपारी अरुण गवळीने घेतली होती हे पुढे तपासात निष्पन्न झाले. ही माहिती कशी समजली हे देखिल जाणून घेणे रंजक आहे. ज्यावेळी मुंबई क्राईम ब्रँच अरुण गवळी विरुद्ध 'वाॅटर टाईट' केस बांधण्याच्या प्रयत्नात असतानाच २६ एप्रील २००८ रोजी क्राईम ब्रँचच्या गुप्तचरांना काळबादेवी इथल्या एका सराफी पेढीवर दरोडा पडणार असल्याची खबर मिळाली. या पेढीच्या शेजारीच असलेल्या एका हाॅटेलमधून बाहेर पडत असलेल्या संशयितांना क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले. यापैकी विजय कुमार गिरी या एका आरोपीकडे पोलिसांना एक दस्ता नसलेली एक गावठी हँडगन व एक जिवंत काडतूस सापडले. या टोळीवर दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा गुन्हा दाखल झाला. 

त्यावेळी क्राईम ब्रँचच्या युनिट ३ मध्ये अरुण गवळीकडे आधीच्या प्रकरणांचा तपास सुरु होता. त्याच वेळी या दरोड्याच्या प्रकरणातल्या संशयितांची कस्टडी युनिट ३ ने घ्यावी अशी विनंती क्राईम ब्रँचच्या सेंट्रल इंटिलिजन्स युनिटने केली. त्या नुसार गिरीसह पाच जणांना ताब्यात घेऊन युनिट ३ ने चौकशी सुरु केली. या तपासातच क्राईम ब्रँचच्या अत्यंत चाणाक्ष अशा चंद्रकांत राऊत या काँन्स्टेबलला एक 'क्लू' मिळाला. दरोड्याच्या प्रकरणात सापडलेली हँडगन मार्च २००७ मध्ये झालेल्या एका खळबळजनक खून प्रकरणात वापरली गेल्याची माहिती राऊत यांनी आरोपींकडून मिळवली. हे प्रकरण होते शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या खुनाचे.

काय होते जमसंडीकर खून प्रकरण

२००७ मध्ये झालेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. मोहिली गाव (एल वाॅर्ड)च्या निवडणुकीत अरूण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा उमेदवार अजित राणेचा पराभव झाला. तो पराभव केला होता शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांनी. या निवडणुकीनंतर सुमारे महिनाभराने म्हणजे २ मार्चच्या दिवशी जमसंडेकर मोहिनी पाईप लाईन जवळ असलेल्या असल्फा गावातील रुमानी मंझिल चाळीतल्या आपल्या घरात बसले होते. त्यांचे कुटुंबियही घरातच होते. अचानक घरातल्यांना फटाका फुटल्याचा आवाज झाला. जमसंडेकर यांची पुतणी मनाली हा आवाज ऐकून धावली. दोन अनोळखी इसम दरवाजातून पळून जाताना तिला दिसते. खोलीत तिचे काका कमलाकर जमसंडेकर पडले होते. त्यांच्या डोक्यातून रक्त वहात होते. शेजाऱ्यांच्या मदतीने जमसंडेकर यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. 

त्यावेळी साकीनाका पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. पण ती निव्वळ धूळफेक होती. अरुण गवळीला सुरक्षित ठेवण्यासाठीची.  प्रत्यक्षातहा खून घडवून आणला होता जमसंडेकर यांचे राजकीय गुरु साहेबराव भिंताडे आणि त्याचा भागिदार बाळू सुर्वे यांनी. राजकीय आणि प्राॅपर्टीच्या वादातून त्यांचे जमसंडेकर यांच्याशी वाजलं होतं. त्यातूनच त्यांनी जमसंडेकरांचा 'गेम वाजवायचा' निर्णय घेतला आणि ती सुपारी आली 'डॅडी'कडं म्हणजेच अरुण गवळीकडं. नंतरच्या काळात गवळीची गठडी पोलिसांनी बांधलीच. त्याला कारण ठरली 'ती' दस्ता नसलेली गावठी बंदूक!

(सौजन्य : लेट मी से इट नाऊ - ले. राकेश मारिया (LET ME SAY IT NOW - By Rakesh Maria)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com