Chandrakant Patil Reacts about Sambhaji Bhide's Demand about Ram Mandir | Sarkarnama

रामाच्या मूर्तीला मिशा; चंद्रकांत पाटील म्हणतात...हा तर संशोधनाचा विषय

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

रामाच्या मुर्तीला मिशा असाव्यात का नसाव्यात, मी यावरती काहीही बोलू शकत नाही.  हा संशोधनाचा विषय आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी मुर्तीबद्दल व्यक्त केलेले मत हे वैयक्तीक आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे

सांगली : ''शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात, असे विधान केले आहे. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.  त्यामुळे  रामाच्या मुर्तीला मिशा असाव्यात का नसाव्यात, मी यावरती काहीही बोलू शकत नाही.  हा संशोधनाचा विषय आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी मुर्तीबद्दल व्यक्त केलेले मत हे वैयक्तीक आहे,'' असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. 

अयोध्येतील राम मंदिरात ठेवण्यात येणाऱ्या पुरुष देवतांच्या मूर्तींना मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केली आहे. त्याबाबत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भिडे गुरुजींनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. इस्लामपूर चे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रकाश हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. "राम मंदीर भुमीपूजनाचा सोहळा साजरा करताना सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळावा. सर्वत्र गुढ्या उभा कराव्यात. देशातील प्रत्येक नियम पाळणारा हा हिंदू आहे,असे मी समजतो. राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा भाग आहे. मंदिर शांततेने पूर्ण व्हावे ही अपेक्षा आहे. राम या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. मंदिराच्या उभारणीचा आनंद सर्वानी आपापल्या घरी राहून साजरा करावा," असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. 

राज्य सरकारचा जनतेशी संवाद राहिलेला नसल्याने लोकांच्या मनात कोरोनाबद्दल भीती आहे, असे सांगून पाटील म्हणाले,  "मुख्यमंत्री- पालकमंत्र्यांनी कोरोनाचा रोज आढावा घ्यायला हवा. संवाद नसल्याने जनता सैरभैर झाली आहे.  मुख्यमंत्र्यांनी राज्याचा आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा न सोडता रोज आढावा घेऊन कोरोनाने भयभीत झालेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'मातोश्री ' या त्यांच्या निवासस्थानातून राज्य चालवितात .  त्यामुळे या सरकारचा जनतेशी संवाद राहिलेला नाही," राज्य सरकार ठाण्यात धारावी पॅटर्न का राबवत नाही, असा सवालही पाटील यांनी केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख