artist Chetan Raut Draws Portrait of Miniter Eknath Shinde with Pins | Sarkarnama

एकनाथ शिंदे यांना पोर्ट्रेटमधून सलामी; कोरोना लढ्याचे चेतन राऊत यांच्याकडून कौतुक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

एकनाथ शिंदे यांना सलाम करण्यासाठी व त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी जागतिक पातळीवरचे कलाकार चेतन राऊत यांनी ३ हजार ८८८ पुश पिन पासून २४ इंच x १८ इंच आकाराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोर्ट्रेट साकारत गौरव केला आहे.

ठाणे  : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रशासनाच्या हातात हात घालून कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरले आहेत. शिंदे पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत. त्यांच्या या कार्याचा जागतिक पातळीवरचे कलाकार चेतन राऊत यांनी पोर्ट्रेटच्या माध्यमातून गौरव केला आहे.

ठाणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पालिका प्रशासन यांच्यासह विविध प्रशासकीय विभाग कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या जोडीला पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील कोरोनाच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. नियमित अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, कुठे गोरगरीब उपाशी राहू नये यासाठी तयार शिजवलेले अन्नाचे वाटप करणे, कुठे धान्याच्या किट घरोघरी पोहोचविणे, कोणालाही कसली कमी पडू नये यासाठी विशेष लक्ष ठेवणे याच्यासह पायाला भिंगरी लावल्यागत जिल्हाभर फिरून अधिकाऱ्यांसोबत कोरोनाला आळा घालण्यासाठी काम करत आहेत.

काल परवा तर एका कुटुंबाला कोरोनाची लागण झालेली असताना, आश्‍चर्यकारक त्याच कुटुंबातील ११ महिन्यांच्या मुलीला मात्र त्याची लागण झाली नव्हती. त्या मुलीची भेट घेऊन तिच्यासोबत खेळणे, गरजूंना अत्यावश्‍यक वस्तू आणि आरोग्य सेवा मिळवून देणे, अशी विविध कामे पालकमंत्री शिंदे स्वत: जातीने लक्ष देऊन आपल्या सैनिकांकडून पूर्ण करून घेत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी व त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी जागतिक पातळीवरचे कलाकार चेतन राऊत यांनी ३ हजार ८८८ पुश पिन पासून २४ इंच x १८ इंच आकाराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोर्ट्रेट साकारत गौरव केला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख