.....जुनी छायाचित्रे पहात शरद पवार यांनी दिला गतस्मृतींना उजाळा!

१९६७ च्या निवडणूकीपासून शरद पवार यांचे राजकारण सुरु झाले आणि काळे यांनी आपला छायाचित्रणाचा व्यवसाय त्याच वर्षी सुरु केला. शरद पवार यांचे असंख्य फोटो त्यांनी आपल्या कॅमे-यात गेल्या पाच दशकांमध्ये टिपले आहेत. हे फोटो पहात पवार काल आठवणीत रमले होते
Sharad Pawar Watching his old Photographs
Sharad Pawar Watching his old Photographs

बारामती : माणूस जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर गेला तरी गतआयुष्याच्या स्मृतींना नकळतपणे उजाळा मिळतच असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही काल आपलीच काही दुर्मिळ छायाचित्रे पाहून जुन्या काळात रमले.  बारामतीचे ज्येष्ठ छायाचित्रकार गंगाधर काळे (नाना) व शरद पवार यांच्या भेटीत हा योग जुळून आला

१९६७ च्या निवडणूकीपासून शरद पवार यांचे राजकारण सुरु झाले आणि काळे यांनी आपला छायाचित्रणाचा व्यवसाय त्याच वर्षी सुरु केला. शरद पवार यांचे असंख्य फोटो त्यांनी आपल्या कॅमे-यात गेल्या पाच दशकांमध्ये  टिपले आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या जुन्या छायाचित्रांचा संग्रह करण्याचे काम हाती घेतले आहे. या निमित्ताने गंगाधर काळे यांच्याकडील फोटोंचा खजिना सुप्रियाताईंनी पाहिला. त्यांच्याकडचे फोटो पाहून त्या अक्षरशः हरखल्या.  पवारसाहेब बारामतीत येतील तेव्हा एकदा त्याना काळे यांना भेटवण्याचा निर्णय सौ. सुळे यांनी घेतला.

शरद पवार व गंगाधर काळे यांचा चांगला परिचय. दोघांनीही या भेटीला मान्यता दिली आणि काल ही एक आगळीवेगळी भेट झाली. पवार साहेबांकडे जाताना नाना काळे आपल्या संग्रहातील निवडक ५०  दुर्मिळ फोटो घेऊन गेले होते.  शरद पवारते पाहताना साहजिकच जुन्या आठवणींमध्ये रमले. काळे यांनी प्रत्येक फोटोच्या मागे त्या फोटोचा तपशिल व सालही आवर्जून लिहीले आहे. पण पवारसाहेबांची स्मरणशक्तीच एवढी अफाट की एकाही फोटोच्या मागील तपशिल पाहायची वेळच त्यांच्यावर आली नाही. प्रत्येक फोटो पहात त्यांनी अचूकपणे तो फोटो कोणता आणि कोणत्या ठिकाणी काढला, फोटोमध्ये कोण कोण आहे, याची बिनचूक माहिती दिली. 

माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गंगाधर काळे व त्यांचे चिरंजिव छायाचित्रकार गिरीश काळेही हे सगळे पाहूनअवाक झाले होते. माजी पंतप्रधान  राजीव गांधी, चंद्रशेखर, चरणसिंग, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यापासून ते प्रभाताई राव, आय.एच.एल. लतीफ, मर्झबान पात्रावाला, यांच्यापर्यंत व उद्योगपती राहुलकुमार बजाज यांच्यापासून ते कुस्तीगीर हरिश्र्चंद्र बिराजदार व हिरामण बनकर यांच्यापर्यंत अनेकां बरोबर काढलेली छायाचित्रे पाहून पवारसाहेबही जुन्या आठवणींमध्ये रमले होते. फोटो पहात पहात त्यांनी त्या काळातील संदर्भही सांगितले आणि फोटोतील व्यक्तींचीही ओळीने माहिती दिली. 

नानांच्या प्रकृतीची केली चौकशी

भेटीच्या प्रारंभीच पवार यांनी नानांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि वयही विचारले. या वयात नाना अजूनही गाडीवरुन फिरतात हे ऐकल्यावर आता या काळात घराबाहेर पडायचे टाळा आणि गाडी नका चालवू, असा सल्लाही शरद पवार यांनी गंगाधर काळे यांना दिला. 

प्रतिभाताईंनी मागून घेतला घोड्यावरचा फोटो

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधील जनवस्तूसंग्रहालय निर्माण केले आहे. त्यावेळी  तेव्हा सौ. प्रतिभाताई पवार यांनी पवारसाहेबांचा घोड्यावरचा फोटो मागून घेतला होता, अशी आठवण गंगाधर काळे यांनी सांगितली. पवार साहेब स्वतःच्या लग्नात सुध्दा घोड्यावर बसले नव्हते.  पण लोकांच्या आग्रहाखातर मात्र घोड्यावर बसले, असे सांगून प्रतिभाताईंनी हा फोटो माझ्याकडून गामामार्फत मागवून घेतला होता, अशी आठवण काळे यांनी सांगितली. बारामती तालुक्यातील विठ्ठलवाडी ते खांडज हे अंतर लोकांच्या आग्रहाखातर १९७७ मध्ये त्यांनी घोड्यावरुन पार केले होते, असा संदर्भ काळे यांनी दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com