वर्षपूर्ती....पहाटेच्या 'त्या' फसलेल्या शपथविधीची

२३ नोव्हेंबर, २०१९ ची पहाट उगवली तिच एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याची त्या बातमीने राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला. पण ही खेळी नंतर फसलीच. आज त्या फसलेल्या शपथविधीची वर्षपूर्ती!
Sharad Pawar - Devendra Fadanavis - Ajit Pawar - Uddhav Thackeray
Sharad Pawar - Devendra Fadanavis - Ajit Pawar - Uddhav Thackeray

पुणे : २३ नोव्हेंबर, २०१९ ची पहाट उगवली तिच एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याची त्या बातमीने राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला. पण ही खेळी नंतर फसलीच. आज त्या फसलेल्या शपथविधीची वर्षपूर्ती!

विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मी पुन्हा येणार...अशी गर्जना देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आपणच मुख्यमंत्री होणार, याबाबत फडणवीसांना अपेक्षा होती. राज्यात दीडशे जागा मिळणार असे भाजप नेते सांगत होते. पण त्यांना १०५ जागा मिळाल्या. बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता होती. भाजपने १५२ जागा लढल्या होत्या. सत्तेतले त्यांचे भागिदार शिवसेनेने १२४ जागी उमेदवार दिले होते. तर एनडीएतल्या मित्र पक्षांनी १२ जागा लढवल्या होत्या. शिवसेनेचे ५६ उमेदवार निवडून आले. 

मग सुरु झाली मुख्यमंत्री पदासाठीची रस्सीखेच. शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. भाजपने निवडणुकीपूर्वी आम्हाला तसा शब्द दिला होता, असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे होते. तर असा शब्द दिलाच नव्हता, यावर भाजपचे नेते ठाम होते. तेथून दोन मित्रांमध्ये अंतर पडायला सुरुवात झाली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक साधते आहे, हे स्पष्ट होत होते. राज्यात सरकार स्थापन करायला कुणीच समोर येत नाही हे पाहून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

दुसरीकडे काँग्रेसला ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी मान्यता देण्याचे संकेत राष्ट्रवादीकडून मिळत होते. जयंत पाटील यांचे नांव उपमुख्यमंत्री पदासाठी घेतले जात होते. त्यामुळे अजित पवार काही प्रमाणात नाराज होते. या नाराजीचा फायदा घेण्याचे भाजपच्या चाणक्यांनी ठरवले. अजित पवारांच्या गटाचे किमान ४० आमदार येतील अशी अटकळ या नेत्यांनी बांधली. आपले १०५, शिवसेना वगळून मित्रपक्ष व अपक्ष असे १५ आणि अजित पवार यांच्या गटाचे आमदार असे मिळून सरकार स्थापनेचा दावा करता येईल, असा विचार करुन खल सुरु झाला. 

शिवसेनेबरोबर कुठलाच तोडगा निघण्याची शक्यता संपली होती. २२ नोव्हेंबरला मध्यरात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मधील सोफीटेल हाॅटेलमध्ये बैठक झाली. दिल्लीच्या धुरीणांनी पहाटेच राष्ट्रपती राजवट उठवल्याचा संदेश राज्यपालांना पाठवला. आणि त्यानंतर अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे २३ नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना अवघ्या ८० तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला असतानाही शिवसेनेने युती तोडल्याने राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेत्यांकडे विचारणा केली. त्यांनी स्थिर सरकारच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा दिला, असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. सरकार स्थापन होत नव्हते. कुणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बनणार नाही, असे आपण शरद पवार यांना सांगितले होते. त्यामुळे भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असे अजितदादा म्हणाले होते. पण शेवटी शरद पवार यांचा अनुभव कामी आला आणि राज्यात शिवसेना - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com