पडळकर यांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा! अजितदादांना सुद्धा नाही विसरले!

नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी फडणवीसच हवेत, असे गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पडळकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
BJP MLA Gopichand Padalkar Gives Birthday Wishes to Devendra Fadanavis And Ajit Pawar
BJP MLA Gopichand Padalkar Gives Birthday Wishes to Devendra Fadanavis And Ajit Pawar

पुणे :  भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'फडणवीस ही तर महाराष्ट्राची गरज आहे' असे म्हटले आहे. फडणवीस यांचे सरकार आणि महाविकास आघाडीचे सरकार यांची तुलना करत पडळकर यांनी  कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी फडणवीसच हवेत, असेही म्हटले आहे.  बारामतीत अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवलेले पडळकर पवार यांनाही शुभेच्छा देण्यास विसरलेले नाहीत!

फडणवीस यांना शुभेच्छा देताना पडळकर म्हणतात, ''देवेंद्र यांनी अवघ्या पाच वर्षांच्या कालावधी राज्याच्या सर्वांगीण पातळीवर शाश्वत विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रानेही यावर दाद देत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. आजवरच्या सर्व प्रचलित राजकीय चौकटी मोडत महाराष्ट्राने विकासाभिमुख चेहऱ्याला कौल दिला. मात्र सत्तापिपासू पक्षाने सर्व नैतिकता बाजूला ठेवत अनैतिक आणि अनैसर्गिक आघाडी करत जनमताला तिलांजली वाहिली. असो, जे घडले, ते घडले'

'पडळकर पुढे म्हणतात.....केवळ सत्ता हा एकच धागा पडकून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे सरकार आणि देवेंद्रजींचे सरकार याची तुलना करताना महाराष्ट्राला फडणवीस यांची गरज अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. आताच्या सरकारमध्ये नसलेली एकवाक्यता, व्हिजनशिवाय सुरु असलेली वाटचाल, प्रशासकीय घटकांचा जास्तीचा प्रभाव आणि वेळोवेळी दिसून आलेली वैचारिक भिन्नता आज महाराष्ट्रासमोर आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना कोणतीही दिशा या सरकारला नाही......

..........आर्थिक गाडा रुळावर आणताना आणि कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या व्यवस्थेत विसंगती, विसंवाद आणि हेवेदावे स्पष्ट दिसत आहेत. एकीकडे 'पुनःश्च हरी ओम' म्हणायचं आणि पुनःश्च लॉकडाऊन करायचा यामुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्ग मेटाकुटीला आला आहे. आज फडणवीस असते, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. याचे महत्वाचं कारण म्हणजे, देवेंद्रजींमध्ये संकटांचा सामना करण्यात असलेला हातखंडा'.......असेही पडळकर म्हणाले.

फडणवीस आणि कुटुंबियांवर झालेल्या ट्रोलवर पडळकर म्हणतात....'पाच वर्षांच्या कालावधीत त्यांना 'फडणवीस' असल्याने कोणत्या पातळीवर ट्रोल केलं गेले, हेही आपण पाहिले. वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर ट्रोल करूनही देवेंद्रजी कधीही डगमगले नाहीत. महाराष्ट्र हिताचा विचार करत पुढे-पुढे जात राहिले. मोठमोठ्या आंदोलनांचा सन्मान करत यथोचित मार्ग काढताना राज्याचा समतोल राखत विकासाची गती त्यांनी कायम ठेवली. प्रशासनावर असलेली उत्तम पकड, दूरदर्शी भूमिका आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची सवय माझ्यासारख्याला भावणारी आहे....

.....मध्यंतरीच्या कालावधीत मी देवेंद्रजींपासून दुरावलो होतो. पण त्याही काळात त्यांच्या नेतृत्वावर कधीही शंका उपस्थित करु शकलो नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात निर्माण झालेला आदर, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा!' या फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेल्या शेरवर टिप्पणी करत पडळकर म्हणतात..... 'होय देवेंद्रजी, तुम्ही समुद्राप्रमाणे विशाल मनाचे, विशाल कर्तृत्वाचे, विशाल दुरदर्शी असलेले नेते आहात. या महाराष्ट्राला आज तुमची गरज आहे, कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी.

'पडळकरांकडून अजितदादांनाही शुभेच्छा!
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी. पडळकर यांनी फडणवीस यांना शुभेच्छा तर दिल्याच मात्र बारामतीत अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढूनही ते वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत. शुभेच्छा देताना त्यांनी अजितदादांना उत्तम आणि दीर्घायु लाभो, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com