राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तो सल्ला मानला असता, तर पंढरपुरात वेगळा निकाल दिसला असता - Had Jayashree Bhalke been given the nomination, a different result would have been seen in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तो सल्ला मानला असता, तर पंढरपुरात वेगळा निकाल दिसला असता

भारत नागणे
सोमवार, 3 मे 2021

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील जयश्री भालके यांच्या नावाचा आग्रह धरला होता.

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. या पराभवांच्या कारणांची मिमांसा आता सुरू झाली आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना पक्षाने उमेदवारी दिली असती, तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला ही राखता आली असती, असे मत आता राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना तीनही पक्षांची राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव हा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून पराभवांच्या कारणांचा शोध आणि बोध घेण्याचे काम सुरु आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असती, तर निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता, अशी मतं अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत.

भारत भालकेंच्या निधनानंतर राजकीय वारसदार कोण, या विषयी फारसी चर्चा झाली नसली तरी बहुतांश निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जयश्री भालके यांनाच विधानसभेची उमेदवारी देणे, हे पक्षासाठी अधिक सोयीचे होणार असल्याची भावना निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेत्यांजवळ व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील जयश्री भालके यांच्या नावाचा आग्रह धरला होता. परंतु काही स्थानिक नेतेमंडळींनी ज्येष्ठांच्या मतांचा विचार न करता भगिरथ भालकेंना उमेदवारी देण्यासाठी श्रेष्ठींकडे आग्रह धरला होता.

उमेदवारी कोणाला द्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पंढरपुरात येवून कार्यकर्त्यांची मते देखील जाणून घेतली होती. त्यामध्ये देखील अनेक ज्येष्ठांनी जयश्री भालके यांच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केली होती. 

ज्येष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत अतिआत्मविश्वासाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भगिरथ भालके यांचे नाव जाहीर केले. तरीही दिवंगत आमदार भारत भालकेंच्या प्रेमापोटी आणि  सहानुभूती म्हणून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातून भगिरथ भालकेंना जवळपास 1 लाख 5  हजार 717 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली. यामध्ये समाधान अवताडे यांनी अवघ्या 3 हजार 733 मतांनी बाजी मारली. अटीतटीच्या या लढतीमध्ये भगिरथ भालकेंचा निसटत्या मतांनी पराभव झाला. निकालानंतर आता भगिरथऐवजी जयश्री भालके यांना उमेदवारी दिली असती तर त्या विजयी झाल्या असत्या, अशी हुरहूर कार्यकर्त्यांमधून दिसून
येत आहे.

प्रशांत परिचारकांनीही तयारी दर्शवली होती 

निवडणुकीच्या प्रचारातही बिनविरोधचा मुद्दा आला होता. एका प्रचारसभेत बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी त्याबाबत भाष्य केले होते. ‘(स्व.) आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असती तर भाजपने ही जागा बिनविरोध केली असती. रामायणात एका मुलाचे राज्य आईने काढून घेतल्याचे ऐकले होते. येथे मात्र मुलानेच आईचे राज्य हिरावून घेतले आहे,’ असा आरोप केला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख