माझी ओढाताण पाहून अर्धा पगार द्या, हे सांगण्यासाठी शिक्षक येतील, असे वाटले होते 

अरे...बाबांनो जरा इतरांच्या वेदनांचा विचार करणार आहात की नाही?
Deputy Chief Minister Ajit Pawar expressed displeasure over the demands of teachers in the state
Deputy Chief Minister Ajit Pawar expressed displeasure over the demands of teachers in the state

माळेगाव (जि. पुणे) : "कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती अडचणीत आली होती. शेतकऱ्यांसह छोटे-मोठे उद्योगधंदे कोलमडून गेले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांचे हाल आम्हाला पाहवत नव्हते. संबंधित घटकांबरोबर कोरोनायोद्धांना आर्थिक मदत करण्यासाठी "क्‍लास वन' आणि "क्‍लास टू' च्या अधिकाऱ्यांचे वेतन निम्याने कमी केले. पण, याही काळात 12 हजार कोटींचे वेतन शिक्षकांना पाच महिने घरी बसून दिले. खरेतर मला वाटत होते की मी अर्थमंत्री असल्याने माझी पैशाची ओढाताण पाहून हे शिक्षकमंडळी आम्हाला अर्धा पगार द्या म्हणण्यासाठी येतील, असे वाटले होते. परंतु त्यांनी तर आमचा पाच तारखेलाच पगार झाला पाहिजे, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. अरे...बाबांनो जरा इतरांच्या वेदनांचा विचार करणार आहात की नाही?'' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकांच्या मागण्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, राज्याच्या तिजोरीची स्थिती बरी झाली की कर्जमाफीत सवलती जाहीर केलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल, असेही पवार यांनी आवर्जून सांगितले. 

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकर सहकार संकुलासह विविध विकास कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. 

या वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मला पानसरे, सीईओ आयुष प्रसाद, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, दत्तात्रेय येळे, पुरुषोत्तम जगताप, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे, नीता बारवकर, सदीप जगताप, संजय भोसले, दीपक तावरे, प्रदीप धापटे, राहुल काळभोर, वसंतराव तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

"शेतकऱ्यांना महत्वाकांक्षी कर्जमाफी दिली; परंतु जे नियमित कर्जदार आहेत, त्यांना मदत करण्यासाठी जाहीर केलेल्या योजनेपासून राज्य सरकार मागे हटणार नाही. सरकारी तिजोरीची आर्थिक स्थिती सुधारल्याशिवाय याबाबत निर्णय घेतला जाणार नाही,'' असे अजित पवार म्हणाले. 

"राज्यात शेती पंपाचे थकीत वीजबिल 40 हजार कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी सरकारने पन्नास टक्के सवलतीवर थकबाकी वसुली योजना जाहीर केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. दुसरीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच शेतकरी केंद्राविरुद्ध आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले आहे. हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे,'' असा आरोपही त्यांनी केला. 

"कोरोनाची पार्श्वभूमी असताना राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या; परंतु मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र लांबणीवर पडल्या आहेत. वास्तविक तसे घडणे उचित नाही. पुढील काही दिवसांतच संबंधित सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल,'' अशी माहितीही पवार यांनी या वेळी दिली. 


कामचुकारांवर कारवाई करणार 

माळेगाव-पणदरे येथे जिल्हा परिषदस्तरावर सुमारे सात कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारती उभारल्या आहेत. या अद्ययावत इमारतींचे उद्‌घाटन करताना मला आनंद होत आहे. अर्थात, ही आरोग्य मंदिरे स्वच्छ व सेवाभिमुख राहण्यासाठी येथील डॉक्‍टरांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून सामान्यांच्या वेदना कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. यापुढे वैद्यकीय क्षेत्रात जे चांगले काम करतील, त्याचे कौतुक होईल; परंतु जे कामचुकारपणा करतील, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com