भुकूम : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यक्रम येथे सुरु असतानाच पंतप्रधानांच्या लाईव्ह कार्यक्रमाची वेळ झाली. त्यावेळी 'माझे घड्याळाकडे लक्ष आहे,' असं पाटील भाषणात म्हणाले. कुठले घड्याळ अशी मिस्किल विचारणा खासदार गिरीष बापटांनी केल्यावर चंद्रकांत पाटील उद्गारले...माझ्या हातातील घड्याळाकडे माझे लक्ष आहे. दुसऱ्या घड्याळाकडे लक्ष दिल्यास माझेच बारा वाजतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ कोटी शेतकऱ्यांना प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेअतंर्गत निधी वाटपाच्या कार्यक्रमाचे जाहीर प्रसारण येथे करण्यात आले. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही हलकी फुलकी टिपण्णी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकवून गेली. यावेळी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री बाळा भेगडे, माधव भंडारी, जालिंदर कामठे, नगरसेवक किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, अमोल बालवडकर, अल्पना वरपे, श्रध्दा प्रभुणे, तालुका महिला अध्यक्षा वैशाली सणस उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी सह वर्षात शेतकऱ्यांनी समृध्दी, सुख व सुरक्षितता मिळावी यासाठी प्रयत्न केले. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी केले नाही ते मोदी सरकारने करून दाखवीले आहे. शेतकऱ्यांचे खरे दुःख मोदींने ओळखले. त्यामुळे शेतीचा पोत सुधारणे, धरणांचे अर्धवट प्रकल्प पूर्ण करणे, पीक विम्यात सुधारणा करणे, अशा उपाययोजना त्यांनी राबवल्या. प्रत्येक शेतकऱ्याला युरिया मिळेल याबाबत कार्यवाही केली,''
"शेतकरी आंदोलनात कम्युनिस्टांचा पुढाकार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या आवाहनाला बळी पडत आहेत. सोनिया गांधीनी शरद पवार यांना कृषी खात्याचे काम नीट करु दिले नाही,'' असा आरोप खासदार गिरीश बापट यांनी यावेळी केला.
Edited By - Amit Golwalkar

