Vilas Lande's Father Vithoba Lande Dies due to old age | Sarkarnama

विलास लांडेंना पितृशोक; शरद पवारांची 'ती' इच्छा राहूनच गेली!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

माजी आमदार विलास लांडे यांचे वडील व माजी नगरसेवक हभप विठोबा सोनबा लांडगे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

भोसरी : माजी आमदार विलास लांडे यांचे वडील व माजी नगरसेवक हभप विठोबा सोनबा लांडगे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्यामागे विलास लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडगे, असे दोन पूत्र, तीन मुली, सून माजी महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक नातू विक्रांत लांडे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. १०२ वर्षांच्या विठोबा लांडगे यांना भेटण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता ही इच्छा राहूनच गेली आहे. 

विठोबा लांडे वारकरी संप्रदायातील आणि कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल समजले जात. त्याचप्रमाणे पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्वही केले. १९७९ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.  आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्यात डांगे पंच दिंडीत ते अनेक वर्षे पायी चालले. वारकरी संप्रदायाचा वारसा चालवित लांडे घराण्याने राजकारणातही नाव कमावले.

लांडे यांच्या मातोश्री इंदूबाई विठोबा लांडे यांचे नुकतेच ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यावेळी पवार यांनी लांडे यांना सांत्वनासाठी फोन केला होता. ''तशी तुमच्या घरात सर्वांचीच तब्येत चांगली आहे. तुमचे वडिलही चांगले आहेत. मला  आठवतेय ते. माझी पहिली निवडणूक होती. आणि तुमच्या घराच्या बाहेर ओटा असायचा. त्यावर तुमचे वडिल बसलेले असायचे. आजूबाजूला आणखी काही लोक बसलेले असत. मला माझ्या राजकारणात तुमचे वडिलांनी भक्कमपणे साथ दिली,'' अशी आठवण पवार यांनी त्यावेळी जागवली होती. 

काय? तुमच्या वडिलांचे वय १०२ आहे;  पुढच्या वेळी मला वडिलांची भेट घेण्यासाठी घेवून जा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्याशी बोलताना जुन्या आठवणी जाग्या केल्या होत्या. आजही माझे वडिल तुमचीच पुजा करतात, दररोज देवघरात तुमची पूजा होते, असे लांडे यांनी त्यावेळी सांगितल्यावर ''पुढच्यावेळी मला वडिलांची भेट घेण्यासाठी घेवून जा,'' असे पवार म्हणाले होते.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख