आवताडे पोटनिवडणूक लढण्यावर ठाम; पण पक्षाबाबत सस्पेन्स कायम 

मंगळवेढा पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व असतानाही त्यांनी आजतागायत कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली नव्हती. परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी सातत्याने हजेरी लावून मतदारांशी संपर्क वाढविला आहे.
Samadhan Awatade insists on fighting by-elections; But suspense over the party's candidacy
Samadhan Awatade insists on fighting by-elections; But suspense over the party's candidacy

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्‍यातील संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मात्र राजकीय पक्षाच्या उमेदवारीबाबत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. सध्या ते विविध विकास कामांच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने पहिल्यापेक्षा दुप्पट वेगाने सक्रीय झाले आहेत. दरम्यान, आवताडे हे कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार की मागच्या दोन निवडणुकांप्रमाणे अपक्ष लढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

विधानसभेच्या 2014 व 2019 च्या निवडणुकीत लक्षवेधी मते घेतलेले समाधान आवताडे हे गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये मृत कुटुंबातील नातेवाईकांचे सांत्वन आणि इतर कार्यक्रमाला उपस्थिती लावून मतदारांशी संपर्क ठेवत आहेत. 

आमदार भारत भालके यांचे नोव्हेंबर 2020 मध्ये अकाली निधन झाले, त्यामुळे पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या अनेक जण दावा करत आहेत. निवडणुकीतील दावेदार लक्षात घेऊन आवताडे यांनी मतदार संपर्क मोहीम कायम ठेवली आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकांत त्यांना पंढरपुरातील 22 गावांतून अपेक्षित मतदान झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पंढरपुरातील 22 गावांतील संपर्क वाढविला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचे यश आले असून त्यांच्या गटाचे काही ग्रामपंचायत सदस्यही निवडून आले आहेत. 

मंगळवेढा पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व असतानाही त्यांनी आजतागायत कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली नव्हती. परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी सातत्याने हजेरी लावून मतदारांशी संपर्क वाढविला आहे. सध्या ते निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सक्रिय झाले असले तरी पक्ष कोणता याबाबत त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. दामाजी कारखान्याच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपचे वरिष्ठ नेते आपल्याशी संपर्क ठेवून असल्याचे सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यांच्याशी कोण संपर्कात आहे. संबंधित राजकीय पक्षाच्या कोणत्या प्रवक्‍त्याने संपर्क साधला, हेदेखील स्पष्ट केले नाही. 

राजकारणात कधीही काहीही घडू शकते याचा नेम नसल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे. महाविकास आघाडी असतानादेखील शिवसेनेच्या शैला गोडसे समर्थकांनीही पंढरपूर-मंगळवेढा ही जागा मूळची शिवसेनेची असल्याचे सांगत गोडसे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी भूमिका मांडत आहेत. भाजपचे आमदार प्रशांत परिचारक व भालके कुटुंबीयांतील वाढता सलोखा पाहता परिचारक नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे मतदारसंघाचे लक्ष असणार आहे. 

दरम्यान, विठ्ठल परिवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्षपदावरून वादंग सुरू झाले आहे. या परिवारातील पाटील कुटुंबीयांनी आज वेगळी भूमिका मांडत विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भगिरथ भालके यांना उमेदवारी मिळाली तरी त्यांना निवडणूक सोपे नसण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com