शरद पवार, अजितदादा यांच्यासमोर पालकमंत्री बदलाचा विषय कोणी काढलाच नाही... - No one complaints against Bharane in front of Sharad Pawar in presence of Bharane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

शरद पवार, अजितदादा यांच्यासमोर पालकमंत्री बदलाचा विषय कोणी काढलाच नाही...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 जून 2021

महेश कोठेदेखील बैठकीला उपस्थित... 

सोलापूर : आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी आतापासून तयारीला लागा, याकामी आपल्या विचाराने चालणाऱ्या महेश कोठे यांची मदत घ्या, असे आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शहर पदाधिकारी व नेत्यांना दिले. या बैठकीत पालकमंत्री बदलाचा विषयच निघाला नसल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने पालकमंत्री बदलाच्या विषयाला पूर्णविराम मिळाल्याचे संकेत आहेत.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक घेतली. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, विद्या लोलगे, महापालिकेतील गटनेते किसन जाधव तसेच सध्या शिवसेनेत पण राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले नगरसवेक महेश कोठे उपस्थित होते.

वाचा ही बातमी : नारायण राणे दिल्लीला गेलेच नाहीत...

या बैठकीत केवळ पक्षाबाबतच चर्चा झाली. आगामी निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी आतापासून तयारी, व्यूहरचना करा. याकामी आपल्या विचाराने चालणाऱ्या महेश कोठे यांची मदत घ्या, पालकमंत्र्यांनीदेखील स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महापालिकेवर सत्ता आणण्याची जबाबदारी घ्यावी, असे आदेश शरद पवार यांनी दिल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या बैठकीत पालकमंत्री भरणे यांना हटविण्याचा विषयच न निघाल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

कोठेंना राष्ट्रवादीची दारे खुली?
ही बैठक शहर राष्ट्रवादीची असली तरी या बैठकीला शिवसेनेचे महेश कोठे यांनादेखील आमंत्रित करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला तांत्रिक कारणामुळे ब्रेक लागला होता. महाविकास आघाडीत फोडाफोडी करावयाची नाही या समझोत्यामुळे कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश लांबणीवर पडला. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीला कोठे यांना बोलाविल्याने आगामी काळात कोठेंना राष्ट्रवादीची दारे खुली होतील, असे संकेत आहेत.

आजच्या बैठकीत पालकमंत्री बदलाविषयी एक शब्दही निघाला नाही. केवळ पक्षासंदर्भात विशेष करुन आगामी निवडणुकीत महापालिकेवर सत्ता आणण्याविषयी चर्चा झाली. महापालिकेवर सत्ता आणण्याकामी कोठेंची मदत घेण्याचे आदेश पवारांनी आम्हाला दिले.
-भारत जाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख