महिला राष्ट्रवादीत धूसफूस : प्रदेश सचिवांपाठोपाठ जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादीतील कार्यपद्धती त्यांनाही पटत नसल्याचे समोर येऊ लागले आहे.
NCP Women's Congress Solapur District President Anita Nagne resigns
NCP Women's Congress Solapur District President Anita Nagne resigns

सोलापूर : गटबाजी आणि नाराजी नाट्यामुळे राष्टवादी कॉंग्रेस कायम चर्चेत असते. फादर आणि युवकमध्ये नेहमी दिसत असलेली गटबाजी आता महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रखरपणे दिसू लागली आहे. सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा अनिता नागणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या रिक्त असलेल्या या पदासाठी नव्या महिला जिल्हाध्यक्षांचा शोध सुरु झाला आहे. (NCP Women's Congress Solapur District President Anita Nagne resigns)

कौटुंबिक कारणासाठी आपण स्वखुशीने महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे अनिता नागणे यांनी सांगितले. पदाचा राजीनामा दिला असला तरीही पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. राष्ट्रवादीने भविष्यात आणखी कोणत्या पदावर संधी दिल्यास आपण काम करणार असल्याचेही नागणे यांनी सांगितले. सुरुवातीला प्रदेश सचिव वैशाली गुंड आणि नंतर महिला जिल्हाध्यक्षा अनिता नागणे यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसमध्ये सारे काही आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही. 

सोलापूरच्या नूतन महिला जिल्हाध्यक्षांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर येत्या काही दिवसांमध्ये सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. महापालिका व नगरपरिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जवळ येत असताना महिला राष्ट्रवादीमध्ये सुरु झालेली धुसफुस चिंताजनक मानली जात आहे. 

प्रदेश सचिव गुंड यांचाही राजीनामा 

प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या सचिव वैशाली गुंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे. राष्ट्रवादीतील मक्तेदारीवर त्यांनी कडवे भाष्य केले आहे. नव्या महिलांना संधी मिळावी; म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले असले तरीही राष्ट्रवादीतील कार्यपद्धती त्यांनाही पटत नसल्याचे समोर येऊ लागले आहे. 

प्रदेशाध्यक्ष बुधवारी सोलापुरात 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे बुधवारी (ता. 23 जून) सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाण्यासाठी बुधवारी रात्री प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापुरात मुक्कामी येण्याची शक्‍यता आहे. सोलापूरच्या या मुक्कामी दौऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची छोटेखानी बैठक होण्याचीही शक्‍यता वर्तविली जात आहे. 


सोलापूर शहर राष्ट्रवादीतही नाराजी 

सोलापूर शहर महिला राष्ट्रवादीमध्ये मनमानी कारभार सुरु आहे. जुन्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही, असा आरोप महिला कार्यकर्त्यांमधून होत आहे. एक व्यक्ती एक पद असताना विद्यमान महिला शहराध्यक्षांकडे विविध पदे आहेत. ग्रामीणसोबत शहर महिला अध्यक्षही बदलावा, अशी मागणी होत आहे. मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, जयश्री पवार, मार्था आसादे, रेखा सपाटे, वंदना भिसे, अनिता गवळी, शोभा गायकवाड यांच्यासह सोलापूर शहर महिला राष्ट्रवादीतील अनेक जुन्या व अनुभवी महिला कार्यकर्त्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे समजते. यातील काही महिला कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

महिला जिल्हाध्यक्षा पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत आठ अर्ज मिळाले असून अर्ज करण्यास आणखी दोन दिवसांची मुदत आहे. शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षांचाही कालावधी संपत आला आहे. या पदासाठी योग्य महिला मिळाल्यास हे पद देखील बदलले जाईल. 

-दीपाली पांढरे, निरीक्षक, महिला राष्ट्रवादी, सोलापूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com