भाजपवाले ऐटीत आले अन्‌ विरोधकांच्या नावाने बोंब ठोकून गेले  - In just half a minute, Solapur's budget of Rs 753 crore was approved | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपवाले ऐटीत आले अन्‌ विरोधकांच्या नावाने बोंब ठोकून गेले 

प्रमोद बोडके  
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

मतदानाची मागणी धुडकावत लावत आज बहुमतातल्या भाजपने दीड महिन्याचे अंदाजपत्रक यशस्वीपणे मांडले म्हणून सभागृह नेते करली यांचे कौतुक सुरु केले.

सोलापूर : अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी मांडलेला पाणीपुरवठ्याचा विषय डोक्‍यात शिरण्याच्या आगोदरच सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी अंदाजपत्रकाचा विषय वाचला. प्रचंड गोंधळात महापौर श्रीकांचना यन्नम यांनीही करलींचा तो विषय ऐकला आणि 2020-21 चे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर झाल्याचे सांगून सभागृहातून काढता पाय घेतला. पाण्यात गुंग झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या नेत्यांना भाजपची चालाखी लक्षात येताच त्यांनी मतदानाची मागणी केली. मतदानाची मागणी धुडकावत लावत आज बहुमतातल्या भाजपने दीड महिन्याचे अंदाजपत्रक यशस्वीपणे मांडले म्हणून सभागृह नेते करली यांचे कौतुक सुरु केले.
 
‘अरे कोण म्हणतयं करत नाही, केल्याशिवाय रहात नाही', "श्रीनिवास करली तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' म्हणत करलींचे आणि महापौरांचे भाजपच्या नगरसेवकांनी मोठ्या थाटात स्वागत केले. आपण सभागृहात किती रुपयांचे बजेट मांडले, बजेटमधील तरतुदी काय आहेत? ही माहिती प्रसार माध्यमांना सांगताना सभागृह नेते करली मात्र पुरते गोंधळले होते. त्यावरुन अंदाजपत्रकाचाच खरा अंदाज अद्यापपर्यंत तरी सभागृह नेत्यांना आणि भाजप नगरसेवकांना आल्या नसल्याचे स्पष्टपणे दिसले. संजीव कोळी, नागेश वल्याळ यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचा धिक्कार सुरु केला. त्यांच्या विरोधातील घोषणा देत असताना त्यांच्या नावाने भाजपच्या नगरसेवकांनी भर सभागृहात बोंबच ठोकली. 

अवघ्या अर्धा मिनिटात ७५३ कोटींचे बजेट मंजूर

मागच्या सभेत बजेट मांडण्यासाठी जोधपुरी घालून आलेले श्रीनिवास करली या सभेत मात्र साधा कुडता व पायजमा घालून आले होते. अर्ध्या मिनिटात महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांनी सोलापूराकंसाठी 2020-2021 चे 753 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करुन घेतले. या अंदाजपत्रकावर ना कोणती चर्चा झाली, ना कोणती सूचना आणि उपसूचना. बहुमतात असलेल्या भाजपने आज सोलापूर महापालिकेत अविस्मरणीय अंदाजपत्रक सादर केल्याने विरोधकांनी भाजपचा धिक्कार केला. 
 
न्यायालयात जाणार : कोठे 

भाजपने आज काळे तोंड घेऊन अंदाजपत्रक मांडण्याचा प्रयत्न केला. कोणतीही चर्चा न करता झालेला हा प्रकार चिंताजनक आहे. लोकशाही मानतो असे सांगणाऱ्या भाजपने आज महापालिकेत हुकुमशाही केली. भाजपच्या या हुकुमशाहीची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती नगरसेवक महेश कोठे यांनी दिली. या अंदाजपत्रकाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
कोठे-शिंदे-चंदनशिवेंचा ठिय्या

राजकीय दबावाखाली येऊन नगरसचिव काम करत आहेत. त्यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे. सभा झाल्यानंतर महेश कोठे, अमोल शिंदे, आनंद चंदनशिवे यांच्यासह इतर नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. आजचे बजेट मंजूर झाले का? असा प्रश्‍न विचारत शिंदे यांनी नगरसचिवांच्या निलंबनाची मागणी केली. 
 
फुलारेंचे अनोखे आंदोलन 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून निधी मिळावा, या मागणीसाठी मागील सभेत आक्रमक झालेल्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आज महापालिकेच्या आवारात बुट आणि चप्पलला पॉलिश करत अक्षरश: पॉलिशगिरी केली. त्यांना नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनीही साथ दिली. सभागृहात पॉलिशचे साहित्य घेऊन आलेल्या फुलारे यांच्याकडील साहित्य पोलिसांनी जप्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख