मानेंशी गुप्तगू, शिंदेंचा पाहुणचार अन्‌ देवदर्शन करून केदारांनी उरकला दौरा 

वेटिंग हॉलमध्ये माजी आमदार दिलीप माने हेदेखील वाट पाहत बसले होते.
Dairy Development Minister Sunil Kedar completed his visit to Solapur in just over an hour
Dairy Development Minister Sunil Kedar completed his visit to Solapur in just over an hour

सोलापूर : भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला सोलापूर जिल्हा दूध संघ, या विळख्यातून दूध संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासकीय मंडळ अध्यक्षाची आदला-बदल यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या दूधातला सहकार आणि आणि सहकारातील राजकारण सध्या भलतेच तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी आज सोलापूरचा दौरा केला. या दौऱ्यात ना कोणता आढावा झाला ना कोणती बैठक झाली. देवदर्शनाची ट्रीप करुन मंत्री केदार अवघ्या तासाभरात सोलापुरातून पुण्याला रवाना झाले. माजी आमदार दिलीप माने यांच्याशी डाक बंगल्यात झालेले गुप्तगू आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरचा पाहुणचार एवढेच वेगळेपण आजच्या दौऱ्यात प्रकर्षाने जाणवले. (Dairy Development Minister Sunil Kedar completed his visit to Solapur in just over an hour)
 
सांगोला तालुक्‍यातील महूद येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्राला मंत्री केदार यांनी भेट दिली. पंढरपूरमार्गे सोलापूर करत ते तुळजापूरला रवाना झाले. मंत्री केदार दुपारी 2 वाजता सोलापुरात येणार म्हणून कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सोलापूर जिल्हा दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाचे अधिकारी व संघातील कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. दुपारी 2 च्या सुमारास आलेले हे सर्वजण मंत्री महोदय जाईपर्यंत सोलापूरच्या डाक बंगल्यातच होते. साडेचारच्या सुमारास मंत्री केदार यांचे आगमन झाले. वेटिंग हॉलमध्ये माजी आमदार दिलीप माने हेदेखील वाट पाहत बसले होते. ‘अहो तुम्ही इथे कशाला बसलात? आत थांबायचे ना? सत्ता येते आणि जाते, आपली मैत्री जुनी आहे,’ असे मंत्री केदार यांनी सांगत माजी आमदार माने यांना दालनात बोलावून घेतले.

त्यानंतर मंत्री केदार व माजी आमदार दिलीप माने यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. दिलीप माने चेअरमन असताना सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ महाविकास आघाडी सरकारने बरखास्त केले. त्यामुळे मंत्री केदार आणि माजी आमदार माने यांच्यात नक्की काय चर्चा झाली? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सोलापूरच्या कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही डाक बंगल्यात हजेरी लावत मंत्री केदार यांचा सत्कार केला. त्यानंतर मंत्री केदार हे आमदार शिंदे यांचा पाहुणचार घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेथून पुण्याला रवाना झाले. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत सोलापूर शहर मध्यमधून एकामेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले आमदार शिंदे व माजी आमदार माने हे केदार यांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते, हे विशेष. 

हीच कॉंग्रेसची मोठी उपलब्धता : केदार

जिल्हा दूध संघाचा विषय, इतिहास, भूगोल माझ्यापेक्षा तुम्हाला (पत्रकारांना) जास्त माहिती आहे. आम्ही कारवाई केली आहे. दूध उत्पादकांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. कॉंग्रेसला देशातून हद्दपार करण्याची गर्जना ज्यांनी केली होती. त्यांना आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमधून हद्दपार केले आहे. हीच कॉंग्रेसची मोठी उपलब्धता आहे, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com