मी अजूनही बारामतीचा नाद सोडलेला नाही : महादेव जानकर  - Will contest in five Lok Sabha constituencies including Baramati: Mahadev Jankar | Politics Marathi News - Sarkarnama

मी अजूनही बारामतीचा नाद सोडलेला नाही : महादेव जानकर 

अण्णा काळे
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

मध्यंतरी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कारखान्यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटलो होतो.

करमाळा : मध्यंतरी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कारखान्यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटलो होतो. परवा जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्‌घाटनाच्या प्रसंगीही आम्ही एका व्यासपीठावर होते. याचा अर्थ मी माझी भूमिका सोडली, असे नाही. माझा पक्ष एनडीएचा घटक असून मी एनडीएसोबतच आहे.

मी पवारसाहेबांना भेटलो, आम्ही एका व्यासपीठावर आलो म्हणजे मी बारामतीचा नाद सोडला, असे होत नाही. येत्या काळात माझा पक्ष बारामतीसह माढा, परभणी, जालना, हिंगोली या पाच मतदारसंघात लोकसभा सर्व ताकदीनिशी लढणार आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी सांगितले. 

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पत्रकार कट्टयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महात्मा फुले समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, प्रा.वैभव फटांगरे उपस्थित होते. 

महादेव जानकर हे 2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात उभे होते. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे होते. त्यावेळी त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 

जानकर म्हणाले की मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तेव्हा मी कुठलेही काम केलेले नव्हते, तरीही लोकांनी मला भरभरून मते दिली. मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेथील लोकांनीही माझ्यावर प्रेम केले.

पवारसाहेब आणि आम्ही एका व्यासपीठावर आलो, म्हणजे मी बारामतीचा नाद सोडला, असे होत नाही. मी जेव्हा पक्षाची स्थापना केली, तेव्हा एकाही ग्रामपंचायतीत माझा सरपंचदेखील नव्हता. आज 27 राज्यांत माझा पक्ष अस्तित्वात असून चार राज्यांत माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. 

प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचा संदर्भ लावत असतो. तसाच संदर्भ माझ्या व पवारसाहेबांच्या भेटीचा आणि एका व्यासपीठावर येण्याचा लावला जात आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नसून मी आज मोदी साहेबांबरोबर आहे. भाजपबरोबर आहे.

माझा राष्ट्रीय समाज पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, हिंगोली, जालना, परभणी या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दाखवून देणार आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख