दामाजी कारखान्यावर आवताडेंची सत्ता आली नसती तर दहा ग्रॅमसुद्धा साखर मिळाली नसती  - MLA Sadabhau Khot criticizes Mahavikas Aghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

दामाजी कारखान्यावर आवताडेंची सत्ता आली नसती तर दहा ग्रॅमसुद्धा साखर मिळाली नसती 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 8 एप्रिल 2021

हे सरकार लुटारू असून ते आपल्या भागाचा विकास काय करणार? 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, अशा वेळी सरकारने दिलासा दिला नाही. संकट काळात जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले. त्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही, त्यांना केवळ राज्याची लूट करायची आहे, हे सरकार लुटारू असून ते आपल्या भागाचा विकास काय करणार? असा सवाल माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केला 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सदाभाऊ खोत हे गुरुवारी (ता. ८ एप्रिल) मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यामध्ये ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, विनायक जाधव, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहाजी पवार, दीपक भोसले आदी उपस्थित होते.

मंत्री खोत म्हणाले की, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत यंदा भाकरी फिरवायची वेळ आली. भाकरी फिरवली नाही, तर करपून जाईल, त्यामुळे एकदा आपल्या मातीतला पोरगा विधानसभेत पाठवूया. समाधान आवताडे यांनी सूतगिरणी उभा करून शेकडो तरुणांना रोजगार दिला. सत्ता नसताना सर्वसामान्यांची कामे करणारा, कर्तबगारी दाखवणारा उमेदवार आहे. संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर सत्ता आली नसती तर सभासदांना दहा ग्रॅमसुद्धा साखर मिळाली नसती, त्यांचे या मातीवर आणि येथील लोकांवर जिवापाड प्रेम आहे. 

आमदार राम सातपुते यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत या सरकारने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केले. भाजपच्या पाच वर्षात असे कधी झाले होते का? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नावे एकरी 25 हजार देण्याची घोषणा केली होती. दिले का पैसे? त्यामुळे हे सरकार जुलमी असून इंग्रजी राजवटीपेक्षा वाईट आहे.

लक्ष्मी ही घड्याळावर येत नाही, अपक्षाच्या काठीवर येत नाही, तर लक्ष्मी ही कमळावर बसून येते; म्हणून भाजपला मतदान करा. बारामतीकरांनी मंगळवेढा-माळशिरसच्या हक्काचे पाणी पळवले, त्यांना धडा शिकवा, ही निवडणूक आमच्या हक्काचे पाणी मिळवायची आहे, म्हणून यंदा परिवर्तन घडवा, असे आवाहन राम सातपुते यांनी केले.

हेही वाचा : राष्ट्रवादीचा राजू शेट्टींना दे धक्का : स्वाभिमानीच्या माजी जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. ८ एप्रिल) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचे जाहीर करत त्यांचे स्वागत केले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे उमेदवार दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही पंढरपूरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे दोन्ही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून आहेत. अशातच स्वाभिमानीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने स्वाभिमानीला पंढरपुरात मोठा धक्का बसला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख