कल्याण काळेंचं अखेर ठरलं; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मागील आठवडाभरापासून कल्याण काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते.
 BJP leader Kalyan Kale will join NCP on April 8
BJP leader Kalyan Kale will join NCP on April 8

पंढरपूर : पंढरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे नेते व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारी (ता. 8 एप्रिल) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत काळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मुद्दा राजकीय वर्तुळात गाजत होता. पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असताना काळे मात्र बार्शी तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षबागांची पाहणी करत होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. त्यांनीही याबाबत सोयीस्करपणे मौन बाळगले होते.

त्यातच सोमवारी (ता. ५ एप्रिल) भारतीय जनता पक्षाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काळे यांची पंढरपुरात भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु काळे यांनी आज स्वतःच राष्ट्रवादी प्रवेशाचा वार आणि तारीख जाहीर केल्याने त्याबाबतच्या शक्यतांवर पडदा पडला आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये कल्याण काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षांपूर्वी काळे यांनी आपल्या साखर  कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला होता. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही.

विठ्ठल परिवारातील घटक असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे.   

दरम्यान, मागील आठवडाभरापासून कल्याण काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रीयश पॅलेस येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे. दरम्यान काळे यांच्या सततच्या धरसोड भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com