पुणे जिल्हा पोलिसांचा थेट गुटखा कारखान्यापर्यंत पोहचण्याचा इरादा पक्का - Shikrapur Police Confiscated Gutkha worth Rupees Forty Thress Lacks | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे जिल्हा पोलिसांचा थेट गुटखा कारखान्यापर्यंत पोहचण्याचा इरादा पक्का

भरत पचंगे
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

शिक्रापूरात शनिवारी रात्री उशिरा उतरलेला हा गुटखा साठा चाकणहून आलेला आहे. चाकण येथे सदर गुटखा कुठून आला आणि हा गुटखा नेमका कुठे उत्पादित झाला त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या सुचनेनुसार तपासाचा पुढील प्रवास या प्रकरणाच्या शेवटापर्यंत नेऊ असा इरादा या धाडीचे प्रमुख विक्रम साळूंखे यांनी व्यक्त केला. 

शिक्रापूर : दहाच दिवसांपूर्वी (ता.१८) पुणे जिल्हा पोलिस अधिक्षकपदी रुजू होवून जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनना बेकायदा दारु-गुटखा विक्री-वितरण पूर्ण बंद करण्याचे फर्मान सोडलेल्या अभिनव देशमुख यांना जिल्हा पोलिसांचा अभिमान वाटावा, अशी तब्बल ४३ लाखांचा बेकायदा गुटखा पकडून देण्याची कारवाई  शिक्रापूर पोलिसांनी केली. 

सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी ही कर्तगारी केली असून सुट्टीचा दिवस असूनही अन्न आणि औषध प्रशासनानेही तात्काळ दखल घेवून सापडलेल्या एकाच परप्रांतिय आरोपीवर इतर गुन्ह्यांबरोबरच विषारी अन्न पदार्थ पूरविण्याचा गंभीर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर गुटखा चाकणहून आल्याने सापडलेल्या गुटखा जिथून उप्तादित होवून शिक्रापूरपर्यंत आलाय तिथपर्यंत पोहचून गुटख्याच्या खोलात जाण्याचा इरादाही श्री साळुंखे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केला.

याबाबत स्वत: कारवाई प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळूंखे यांनी सांगितले की, शिक्रापूरात गजबजलेल्या मांढरेवस्तीतील एका खोलीमध्ये गुटख्याचा मोठा साठा शनिवारी रात्री उशिरा उतरविण्यात आल्याची माहिती खब-याकडून आम्हाला समजली. सदर माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक करुन आम्ही मांढरे वस्तीवर धाड टाकताच संबंधित खोलीत गुटखा, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी, पान मसाला आदी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखाजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळला. यावेळी गुटख्याच्या खोलीत आढळलेल्या उमाशंकर गुप्ता नामक व्यक्तिने याबाबत जी माहिती दिली त्यानुसार आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाला बोलावून या संपूर्ण साठ्याचा पंचनामा व त्याचे मुल्यांकन प्रक्रीया पूर्ण केली असता या साठ्याचे मुल्य ४३ लाख २० हजार एवढे निष्पन्न झाले.

या प्रकरणी प्राथमिक स्तरावर उमाशंकर गुप्ता या इसमावर बेकायदा बंदी असलेल्या पदार्थांचा साठा करणे, जनतेस विषारी प्रकारचे अन्नपदार्थ देण्याच्या व्यापक कटाचा गुन्हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुटखा जिथून आलेला आहे त्या चाकण व त्यापुढील गुटखा प्रवासाची संपूर्ण माहिती घेवून शेवटच्या टोकापर्यंत आम्ही जावून हा तपास पूर्ण करणार असल्याचे श्री साळुंखे यांनी सांगितले. या कारवाईत पोलिस नाईक तेजस रासकर, आंबादास थोरे, अशोक केदार, रवीकिरण जाधव, विकास मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार दत्तात्रय गिरमकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान बेकायदा गुटख्याची गेल्या वर्षभरातील एवढी मोठी पहिलीच कारवाई असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

गुटखा व्हाया चाकण पण त्यापुढेही आम्ही जाणार...!
शिक्रापूरात शनिवारी रात्री उशिरा उतरलेला हा गुटखा साठा चाकणहून आलेला आहे. चाकण येथे सदर गुटखा कुठून आला आणि हा गुटखा नेमका कुठे उत्पादित झाला त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या सुचनेनुसार तपासाचा पुढील प्रवास या प्रकरणाच्या शेवटापर्यंत नेऊ असा इरादा या धाडीचे प्रमुख विक्रम साळूंखे यांनी व्यक्त केला. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख