डिपाॅझिटचे पैसे परत न देणाऱ्या रुग्णालयात युवकाचे अर्धनग्न होत आंदोलन

नाशिकमध्ये अनोखे आंदोलन
nashik youth
nashik youth

नाशिक : कोरोना संसर्गाने आई, वडील, आजी गमावलेल्या मुलाने रुग्णालयाचे बिल वैद्यकीय विमा पॅालिसीद्वारे अदा केले. रुग्णालयाला विमा कंपनीचे पैसे मिळाले. तरीही दिड लाखांसाठी तगादा करणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला वेगळाच धडा शिकवला. या मुलाने `आप`चे नेते जितेंद्र भावे यांसह फेसबुक लाइव्ह करीत अंगावरील कपडे काढून रुग्णालयालाच उघडे पाडले.  (A youth unclothe himself in hospital for refusing refund in Nashik)

रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने गयावया करीत त्यांना कपडे घालण्याची विनंती करीत जादा वसूल केलेले पैसे परत देण्याचे आश्वासन दिल्यावरच त्यांनी अंगावर कपडे घातले. या दरम्यान फेसबुक लाइव्हवर शेकडो नागरिकांनी, रुग्णांनी या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला लाइक करीत आपल्याही अडचणी मांडल्या. या ३३ मिनिटांच्या फेसबुक लाइव्ह आंदोलनाची शहरात मोठी चर्चा तर झालीच, मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांवर होणारे उपचार व आकारली जाणारे पैसे हा विषय चर्चेत आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, शहरात कोरोनाच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडून आकारली जाणारी बिले व त्यावरून होणारे वाद या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते जितेंद्र भावे यांनी `ऑपरेशन हॅास्पिटल` हा उपक्रम सुरु केला होता. त्यात जादा पैसे आकारणी करणाऱ्या रुग्णालयात जाऊन बिले तपासून थेट पोलिसांशी संपर्क करून तक्रार केली जात होती. त्यात अनेकांना न्याय मिळाला. आज या संदर्भात अभियंता असलेल्या व सिन्नर येथे कंपनीत सात हजार रुपये वेतन घेणाऱ्या मुलाने त्यांच्याकडे मदत मागीतली. या मुलाचे आई, वडील व आजीचे कोरोनाने निधन झाले होते. त्याने औषधोपचारासाठी विमा संरक्षण (मेडीक्लेम) घेतला होता. त्यातून या रुग्णालयाला त्याचे बील अदा झाले होते. मात्र तरीही त्यांनी या मुलाकडून दिड लाख रुपये अनामत घेतली होती. ही अनामत रक्कम परत मिळावी यासाठी तो गेल्या चार दिवसांपासून पाठपुरावा करीत होता. मात्र त्याला रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून दाद दिली जात नव्हती. त्याचे फोन देखील घेतले जात नव्हते. त्यामुळे असहाय्य झालेल्या या मुलाने आज श्री. भावे यांच्याशी संपर्क केल्यावर ते थेट रुग्णालयात गेले. 

रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना जादा घेतलेले पैसे परत करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांना टाळण्याचा प्रय्तन केल्यावर त्यांनी थेट पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तुमची पैशाची भूक भागत नसेल तर आम्ही आमचे कपडे काढून ते तुम्हाला देतो, असे सांगत कपडे काढले. यावेळी रुग्णालयाचे सिक्युरिटी गार्ड त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू लागल्यावर त्यांनी आम्हाला हात लावला तर आम्ही अंतर्वस्त्र देखील काढू असे सांगितले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. शेवटी या रुग्णालयाने जादा घेतलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासन नको तर पैसे मिळत नाही तोपर्यंत कपडे घालणार नाही अशी भूमिका मुलाने व श्री. भावे यांनी घेतली. त्यानंतर पैसे देण्यासाठी सगळ्यांचीच धावपळ झाली. 

यावेळी श्री. भावे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रवाणीवर रडले. त्याला काही अर्थ नाही. त्यांनी जनतेची ही लूट थांबवली पाहिजे. त्यावर ठोस पावले टाकली पाहिजेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजदेश टोपे वेगवेगळे आदेश काढतात. त्याला ही रुग्णालये केराची टोपली दाखवतात. जनतेची गैरसोय दूर होत नाही. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडून लोकांना दिलासा दिला पाहिजे व रुग्णांची परवड थांबवली पाहिजे. यासंदर्भात रुग्णालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी अनभिज्ञता व्यक्त करीत काहीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. 
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com