नाशिक : पीकविम्याबाबत राज्य शासन केंद्राच्या मदतीने लवकरच नवीन धोरण हाती घेणार असून, केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथील ईश्वर महाले या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी आले असता ते शेतकऱ्यांशी बोलत होते. यावेळी काही उत्साही शेतकरी म्हणाले, `साहेब हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे जरा लक्ष द्या.`
कृषिमंत्री दादा भुसे यांनी ईश्वर महाले यांच्या तीन एकर नुकसानग्रस्त बागेला भेट देऊन बाहेर निघत असताना परिसरातील शिवसेनेच्या एका उत्साही कार्यकर्त्याने, ‘साहेब, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जरा जास्त लक्ष द्या,’ असे म्हणताच शेजारी उभे असलेले आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मी भाजपचा आमदार आहे, अशी जाणीव करून देताच दुःखात असलेले शेतकरी हसायला लागले.
श्री. भुसे म्हणाले, की केंद्र सरकारने पीकविमा ऐच्छिक केला आहे. याआधी सर्व शेतकऱ्यांचा पीकविमा काढला जायचा. बँका त्याची रक्कम कर्जाच्या रकमेतून वजा करून घ्यायची. आता तसे होत नाही. तो आता ऐच्छिक केला आहे. त्या अनुषंगाने येत्या १४ तारखेला उपसमितीची एक बैठक होणार आहे. शासनस्तरावर असा विचार सुरू आहे, की केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन करून त्यात मागील निकषांबाबत विचार केला जाईल. नवीन विमा योजनेसाठी बीड जिल्ह्यातील मॉडेल शासनातर्फे तयार करण्यात आले आहे. खासगी पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट कशी टाळता येईल, याचा विचार सरकारतर्फे चालू आहे. बारमाही पीकविमा कसा करता येईल, याचेही नियोजन होणार असून, द्राक्ष पिकासाठी स्वतंत्र नियोजन करत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन शासनासमोर मांडण्यात येणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
या वेळी आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समिती माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कारभारी आहेर, गणेश महाले, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, कृषी सहाय्यक संगीता बोंडे, जयंत सोनवणे, धोतरखेडे येथील ज्ञानेश्वर निफाडे, माधव गवळी, सुरेश गायकवाड, देवराम उशीर, राहुल पगार, स्वप्नील निफाडे, सुभाष निफाडे, नाना गुंजाळ आदी उपस्थित होते.
...

