नाशिकमध्ये करेक्ट कार्यक्रम होणार होता पण... 

सांगली महापालिकेच्या महापौरपदाच्या धक्कादायक निकालाने भाजपची राजकीय पिछेहाट झाली. त्यामुळे राज्यात आगामी काळात भाजपची घसरण सुरु होणार असा संदेश गेला. मात्र याची सुरवात नाशिकपासूनच होणार होती.
Bhujbal- Mahajan
Bhujbal- Mahajan

नाशिक : सांगली महापालिकेच्या महापौरपदाच्या धक्कादायक निकालाने भाजपची राजकीय पिछेहाट झाली. त्यामुळे राज्यात आगामी काळात भाजपची घसरण सुरु होणार असा संदेश गेला. मात्र याची सुरवात नाशिकपासूनच होणार होती.

नाशिक महापालिकेत स्वबळावर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे अकरा सदस्य महापौर निवडणुकीत फुटून शिवसेनेचा महापौर होणार होता. हा करेक्ट कार्यक्रम होणार होता. पण शेवटच्या क्षणी कॅांग्रेसच्या दोन सदस्यांनी अवसान गाळल्याने ते टळले.

नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे 66 नगरसेवक निवडून आल्याने पहिल्यांदा स्वबळावर एका पक्षाला सत्ता प्राप्त झाली होती. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र जसे राज्यातील अन्य महापालिकांत होते तसेच नाशिकमध्ये आहे. इथे सत्ता कोणत्या पक्षाची यापेक्षा कारभार हाकणारे कोण? याला महत्व असते. सत्ता कोणाचीही असे त्यात दहा ते बारा सर्वपक्षीय नगरसेवकांचेच पडद्याआडून राज्य चालते. सबंध प्रशासन ते आपल्या कलाने फिरवतात. यंदाही तसेच झाले. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना कोणतिही पदरमोड न करता सत्ता व मोठी पदे मिळाली. मात्र त्याचा उपयोग त्यांनी कसा केला व प्रत्यक्ष कसा करायला हवा होता याचीच तुलना नव्याने निवडून आलेले नगरसेवक व नागरिक करीत राहिले. त्यातच पहिल्या महापौर रंजना भानसी या फारसा प्रभाव दाखवू शकल्या नाहीत. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या राजकीय डावपेचामुळे त्या महापौर झाल्या होत्या. या सानप यांचीच उमेदवारी विधानसभा निवडणुकीत कापली. भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बिनसल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला. 

नव्या राजकीय समिकरणात गतवर्षी महापौर निवडणूक झाली. त्यात भारतीय जनता पक्षाने सतीश कुलकर्णी आणि उपमहापौर पदासाठी भिकुबाई बागूल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, विलास शिंदे, अजय बोरस्ते यांनी दिवसरात्र एक केला होता.   

भाजपची महापालिकेची सूत्रे हलविणा-या बाळासाहेब सानपच विरोधात गेल्याने भाजपचे अकरा नाराज नगरसेवक भाजप विरोधात जाऊन वेगळ्या वाटेने निघाले होते. त्यात भाजपची संख्या 66 वरुन थेट पन्नास ते बावन्न एव्हढी घसरणार होती. शिवसेनेने मनसे, अपक्ष, कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेस यांची मोट बांधली होती. त्यात संख्याबळ त्यांच्या बाजूने होते. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ पालकमंत्री असल्याने राज्यातील सरकारचाही आर्शिवाद त्यांना प्राप्त झाला होता. मात्र या नव्या समिकरणात आपल्याला काहीच महत्व नसेल या राजकीय स्वार्थातून कॅांग्रेस पक्षाच्याच दोन नगरसेवकांनी त्यात खोडा घातला. असक्य असलेल्या मागण्या पुढे रेटून ते त्यावर अडून बसले. त्यातून नवी समिकरणे अनिश्चित बनले. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी स्वपक्षाच्या नाराज नगरसेवकांना चुचकारल्याने बेपत्ता झालेले नगरसेवक शेवटच्या क्षणी नाईलाजाने स्वगृही परतले. राजकीय हित व विचारसरणी यापेक्षी स्वार्थाला महत्व देणारे दोन नगरसेवक भाजपच्या विजयाचे शिल्पकार बनले हे वास्तव लपून राहिले नाही. त्यामुळे जे काल सांगलीत घडले, ते खुप आधी नाशिक महापालिकेत घडणार होते. हा कार्यक्रम `करेक्ट` होणार होता पण... विरोधकांचा ताळमेळ फसला.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com