दादा भुसेंनी ठणकावले, `अन्यथा कटू निर्णय घ्यावे लागतील` - Follow the rules Otherwise strict dicision wiil be taken. Covid19 malegaon | Politics Marathi News - Sarkarnama

दादा भुसेंनी ठणकावले, `अन्यथा कटू निर्णय घ्यावे लागतील`

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून वाढ होत आहे. ही चिंतेची बाब असून, गृहविलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथील विश्रामगृहात झालेल्या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत केल्या.

मालेगाव : कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून वाढ होत आहे. ही चिंतेची बाब असून, गृहविलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथील विश्रामगृहात झालेल्या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत केल्या. 

श्री. भुसे म्हणाले, की शाळा, कॉलेज व खासगी क्लास यांची संयुक्त बैठक घ्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ऑनलाइन शैक्षणिक पद्धतीच्या अवलंबासह मर्यादित संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पोलिस प्रशासन व महापालिकेने संयुक्तपणे पथकांची नेमणूक करून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. कोरोनाच्या टेस्टिंगसह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कटू निर्णय घ्यावे लागतील. 

राज्यात गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यावर मालेगाव शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राचा हॅाटस्पॅाट म्हणून या शहराची गणना झाली होती. कोरोनोग्रस्तांची संख्या प्रचंड वाढल्याने येथे राज्यातील वैद्यकीय पथकाला पाचारण करावे लागले होते. मात्र त्यानंतर सर्वच यंत्रणांनी समन्वय निर्माण केल्याने कोरोना नियंत्रणात आला होता. त्यामुळे कोरोनाचा हॅाटस्पॅाट मालेगावचा पॅटर्न बनला होता. त्यात कृषीमंत्री दादा भुसे यांनी अथक परिश्रम केले होते.  त्यामुळे सध्याची स्थिती हा अलार्म असल्याचे श्री. भुसे यांनी म्हटले आहे. 

शहरातील कोरोनाची परिस्थिती आज नियंत्रणात असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये. नागरिकांनी आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. व्यावसायिकांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही, अशी भूमिका घेऊन ग्राहकांसाठी सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. उपमहापौर नीलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, पोलिस उपअधीक्षक प्रवीण जाधव, तहसीलदार चंद्रजित राजपूत, उपायुक्त नितीन कापडणीस, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेश निकम आदी उपस्थित होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख