`भाजप`ला मोठा झटका...नाशिकचे गिते, बागूल शिवसेनेत ! - BJP leader Vasant Gite, Sunil Bagul joins Shivsena today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

`भाजप`ला मोठा झटका...नाशिकचे गिते, बागूल शिवसेनेत !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गिते आणि सुनिल बागूल या शहरातील दोन्ही मोठ्या नेत्यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. आज सायंकाळी हे दोन्ही नेते शिवसेनेत प्रेवश करतील.

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गिते आणि सुनिल बागूल या शहरातील दोन्ही मोठ्या नेत्यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. आज सायंकाळी हे दोन्ही नेते शिवसेनेत प्रेवश करतील.

विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे आता केवळ तांत्रिकदृष्ट्या भाजपत असतील. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपला अक्षरशः 440 व्होल्टचा झटका मानला जातो. हे राजकीय खिंडार भरुन काढणे अवघड ठरणार आहे.   

या दोन्ही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री या दोन नेत्यांनी नाशिक मध्ये खासदार संजय राऊत यांनी दोन तास प्रवेशा संदर्भात चर्चा केली. त्यांच्या प्रवेशाची आज राऊत पत्रकार परिषदेत घोषणा करणार आहेत. त्यांनतर सायंकाळी सहाला वर्षा बंगल्यावर पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे.

दोन्ही नेते एकेकाळचे शिवसैनिक व सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. श्री. गिते यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांच्याबरोबर जात मनसेत प्रवेश केला होता. पुढे नेत्यांशी मतभेद झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते मनसे विधीमंडळ गटाचे उफनेते होते. माजी महापौर, माजी आमदार तसेच विविध पदांवर काम केलेले गिते यांचा शहरात मोठा संपर्क आहे. त्यांच्याबरोबर विविध पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. सुनील बागूल रिक्शा व टॅक्सी युनियन, विविध कामगार संघटनांचे नेते आहेत. त्यांच्या मातोश्री भाजपच्या विद्यमान उपमहापौर आहेत. श्री. बागूल यांना शिवसेनेने पक्षातंर्गत गटबाजीमुळे पक्षातून काढून टाकले होते. त्यांनतर त्यांनी प्रारंभी राष्ट्रवादी कॅाग्रेस व 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.   

या दोघांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उशिरा भेट घेतली. चर्चेतून दोघांच्या घरवापसीला सिग्नल देण्यात आला; परंतु प्रवेशाच्या मुहूर्ताबाबत अनिश्चितता ठेवण्यात आली. श्री. गिते व बागूल यांचा सर्वस्वी निर्णय खासदार राऊत यांच्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. विविध कार्यक्रमांचे निमित्त साधून शहरात आलेल्या खासदार संजय राऊत यांनी भाजपमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले. आज माध्यम प्रतिनिधींशी या विषयावर ते मत मांडणार आहेत. राऊत यांचा संभ्रम निर्माण करण्याचा स्वभाव लक्षात घेता भाजप नेत्यांकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख