भाजपने निलंबित केलेल्या सुरेश पाटलांचा शिवसेनेने भगवा फेटा बांधून केला सत्कार - BJP suspended corporator Suresh Patil felicitates By Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने निलंबित केलेल्या सुरेश पाटलांचा शिवसेनेने भगवा फेटा बांधून केला सत्कार

विश्वभूषण लिमये
शनिवार, 19 जून 2021

निलंबित नगरसेवकाच्या मदतीला आता शिवसेना धावून आली आहे.

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता. १९ जून) गोंधळ घातल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश पाटील यांचे त्यांच्याच पक्षाच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी निलंबन केले होते. नगरसेवक सुरेश पाटलांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून महापौरांविरोधात घोषणाबाजी करत बोलू न दिल्याने रागाने हातातील माईकही फेकून दिला होता. ह्याच निलंबित नगरसेवकाच्या मदतीला आता शिवसेना धावून आली आहे. (BJP suspended corporator Suresh Patil felicitates By Shiv Sena )

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपचे निलंबित नगरसेवक सुरेश पाटील यांचा सत्कार करून शिवसेनेने सत्ताधारी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि शिवसैनिकांनी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घरी जाऊन हा सत्कार केला आहे. 

हेही वाचा : शिवसेनेचा आदिवासी नेता लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मागच्या तीस वर्षांपासून सुरेश पाटील ही भाजपकडून महापालिकेच्या राजकारणात आहेत. त्यांना अशा पद्धतीने डावलणे हे सोलापूरच्या राजकारणाच्या दृष्टीने घातक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून सुरेश पाटील हे पक्ष विचारांच्या विरोधात विधान करत असल्याचे वारंवार पहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना बदलून काँग्रेसच्या महाराष्ट्र कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करावे असे विधान केले होते. आता शिवसेनेने त्यांचा सत्कार केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 
एकीकडे सोलापूर शिवसेनेचे मातब्बर नेते, माजी महापौर महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महेश कोठे यांच्या जाण्याने झालेल्या नुकसानाची भरपाई आणि आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेने पक्ष बांधणीसाठी उचललेले हे पाऊल तर नाही ना, अशी चर्चा आता सोलापुरात सुरू झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख