'कोरोना'च्या जन्मदात्या चीनला 'बॉश' कामगारांचा पहिला झटका? 

'बॉश' व्यवस्थापन व कामगारांत झालेल्या करारात उत्पादनवाढीसह चीनमध्ये तयार होणारे उत्पादन नाशिकला स्थलांतरीत करण्याचे सुतोवाच आहे. त्यामुळे 'कोविड 19' विषाणूचा जन्मदाता मानल्या जाणाऱ्या चीनला नाशिकच्या कामगारांकडून पहिला झटका बसणार आहे.
Bosch Company in Nashik Made Agreement with Workers Union
Bosch Company in Nashik Made Agreement with Workers Union

नाशिक : जागतिक स्पर्धात्मक दरामुळे महासत्ता बनलेल्या चीनला 'कोरोना'ची चूक महागात पडणार हे जाणवू लागले आहे. त्यादृष्टीने येथील 'बॉश' व्यवस्थापन व कामगारांत झालेल्या करारात उत्पादनवाढीसह चीनमध्ये तयार होणारे उत्पादन नाशिकला स्थलांतरीत करण्याचे सुतोवाच आहेत. त्यामुळे 'कोविड १९' विषाणूचा जन्मदाता मानल्या जाणाऱ्या चीनला नाशिकच्या कामगारांकडून पहिला झटका बसणार असल्याचा दावा केला जात आहे. 

'कोरोना'ला कारणीभूत ठरलेल्या 'कोविड १९' या विषाणूचा प्रसार चीनमधून झाला. या विषाणूने सध्या जगभर हाहाःकार माजला आहे. अर्थव्यवस्थेला हादरे बसत आहेत. त्याची फळे जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या चीनला भोगावी लागण्याची शक्‍यता आहे. त्याचे सुतोवाच नुकत्याच येथील 'बॉश' या जागतिक समुहाच्या कंपनीच्या कामगार करारात करण्यात आले आहे. या करारात कामगार संघटनेने एकाचवेळी उत्पादनवाढ आणि इनसेंटीव्हमध्ये कपातीला मान्यता दिली आहे. त्यात व्यवस्थापनाकडून अन्य देशात तयार होणाऱ्या एका नव्या प्रॉडक्‍टचे उत्पादन नाशिकला सुरु करण्याची तयारी दाखविली आहे. 

चीनमधील प्रकल्पातले एक उत्पादन नाशिकला हलवण्याचा विचार

त्याचबरोबर सध्या 'बॉश'च्या चीनमधील प्रकल्पात तयार होणारे उत्पादन नाशिकला हलविण्याचा विचार आहे. कॉमन रेल डिझेल इंजेक्‍टर (सीआरडीआय) उत्पादन भविष्यात डिझेलचा वापर घटल्यावर प्रवाहाबाहेरचे ठरु शकते. त्यादृष्टिने त्याला पर्याय तयार करण्यात आला आहे. चीनचा प्रकल्प काही प्रमाणात अथवा पुर्णतः चीनमधून स्वीच ओव्हर केल्यास त्याचा सर्वाधीक लाभ नाशिकला होईल. नाशिकच्या प्रकल्पाकडे जागा, प्रशिक्षीत कामगार, अनुकुल पर्यावरण, औद्योगिक सपोर्ट उपलब्ध आहे. त्यामुळे यानिमित्ताने 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर चीनला एक झटका नाशिकमधून मिळणार आहे. त्याला व्यवस्थापनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा देत आम्ही बदललो आहोत. 'बॉश' आणि नाशिकच्या हितासाठी आम्ही काही बदल करण्यासाठी पावले टाकल्याचे सांगीतले. 

औद्योगिक क्षेत्रासाठी चैतन्याचा संदेश

येथील 'बॉश' कंपनीने संकटावर मात करण्याचा निर्धार करताना, ७ टक्के उत्पादनवाढीसह लॉकडाउनच्या नकारात्मक वातावरणात कामगारांना घसघशीत दहा हजारांची वेतनवाढ देताना, २३० प्रशिक्षणार्थी कामगारांना कायम सेवेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंदी आणि कोरोनाचे रडगाणे थांबवून संघर्षावर मात करण्याच्या या सकारात्मक निर्णयामुळे केवळ 'मायको बॉश'च नव्हे, तर भांबावलेल्या सगळ्या औद्योगिक क्षेत्रासाठी हा चैतन्याचा संदेश आहे. 

कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे, सहाय्यक आयुक्त विकास माळी, सहाय्यक कामगार आयुक्त एस. टी. शिर्के, कंपनीचे नाशिक प्रकल्पाचे प्रमुख अनंत रमन, व्यवस्थापक (एचआर) श्रीकांत चव्हाण, वरिष्ठ व्यवस्थापक मुकुंद भट, सतीश कुमार, जतीन सुळे, तमाल सेन, शरद गिते, कामगार युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, नितीन बिडवई, भाऊसाहेब बोराडे, हरिश्‍चंद्र नाठे, विनायक येवले, खजिनदार नंदलाल अहिरे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 

ऑटोमोबाईल क्षेत्र मंदीतून वाटचाल करीत आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या विश्‍वासावर संकटावर मात करु. एक नवे प्रॉडक्‍ट नाशिकला येणार आहे. नाशिक व चीनमधील किमतीत प्रती युनिट ४५ रुपये फरक आहे. आम्ही त्यात यशस्वी होऊ शकतो. 
-अरुण भालेराव, अध्यक्ष, बॉश युनियन, सातपूर. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com