हाथरस घटनेमुळे योगी, भाजपची प्रतिमा डागाळली : उमा भारतींची कबुली  - Yogi, BJP's image tarnished due to Hathras incident: Uma Bharati's confession | Politics Marathi News - Sarkarnama

हाथरस घटनेमुळे योगी, भाजपची प्रतिमा डागाळली : उमा भारतींची कबुली 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

अयोध्येत आपण आताच राम मंदिराचे भूमिपूजन केले, परंतु हाथरसच्या घटनेने पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे.

नवी दिल्ली : हाथरसची घटना आणि पोलिसांच्या कारवाईवर उपस्थित होणारे प्रश्‍नचिन्ह पाहता उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपची प्रतिमा डागाळली आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी व्यक्त केले. याबाबतची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

ट्विटरवरून उमा भारती यांनी म्हटले की, योगी आदित्यनाथ यांनी पारदर्शकपणे राज्याचा कारभार केला असून त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अयोध्येत आपण आताच राम मंदिराचे भूमिपूजन केले, परंतु हाथरसच्या घटनेने पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. आपण सध्या कोरोना वॉर्डमध्ये असून मी अस्वस्थ आहे. मी जर पॉझिटिव्ह नसते, तर हाथरसला नक्कीच गेले असते, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

उमा भारती यांनी पुढे म्हटले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मी हाथरसला त्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला येणार आहे. मोठी बहीण म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माध्यमांचे प्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांना संबंधित कुटुंबीयांना भेटण्याची परवानी द्यावी. आपण माझी ही विनंती मान्य कराल, असे मला वाटते, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

हेही वाचा : रामदास आठवले भेटणार यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना 

मुंबई ः उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या (ता. 3 ऑक्‍टोबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची लखनौ येथे भेट घेणार आहेत. 

हाथरसमधील दलित मुलीवरील सामूहिक अत्याचार आणि हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे आठवले हे आदित्यनाथ यांच्याकडे करणार आहेत. 

सामूहिक अत्याचाराने मृत्युमुखी पडलेल्या दलित मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यास हाथरस येथे आज (ता. 2 ऑक्‍टोबर) आठवले जाणार होते. मात्र, हाथरस जिल्हा प्रशासनाने विनंती केल्यामुळे हाथरसला जाण्याचा दौरा पुढील आठवड्यात आयोजित करणार असल्याचे आठवले यांनी जाहीर केले. 

हाथरसमध्ये जाण्यास कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रशासनाने विरोध केल्यामुळे कॉंग्रेसने देशात मोठे आंदोलन केले होते. मात्र, तसे आंदोलन कॉंग्रेसने हाथरसमधील बळी गेलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करायला पाहिजे होते, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख