Will those who have lost their jobs get a job? | Sarkarnama

रोजगार गमावलेल्यांना काम मिळेल काय?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

ज्यांनी नोकर्‍या गमावल्या त्यांचं नक्की कसं चाललंय, हे राज्यकर्ते कधी सांगतील काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : राममंदिराचे भूमिपूजन होईल, राजस्थानात भाजपला हवे ते घडेल. फ्रान्सवरून राफेल विमानेही अंबालात उतरली. पण ज्यांनी या काळात नोकर्‍या गमावल्या त्यांचं नक्की कसं चाललंय, हे राज्यकर्ते कधी सांगतील काय?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी  'सामना'च्या  'रोखठोक'मधून विचारला आहे. 

कोरोनामुळे अनेकांवर आलेली बेरोजगारी, यावर उपाययोजना, राजस्थानमधील राजकीय़ उलथापालथ आदी विषयावर रोखठोकमधून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. कोरोनामुळे दहा कोटी जणांच्य़ा नोकऱ्या गेल्या. तर 40 कोटी कुंटुबाच्या चुली विझल्या आहेत. यात सर्वात जास्त मध्यमवर्गीय कुंटुबातील नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांच्या प्रश्न केंद्र सरकार कधी सोडविणार ? अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन होईल, राजस्थानात भाजपला हवे ते घडेल. फ्रान्सवरून राफेल विमानेही अंबालात उतरली. पण ज्यांनी या काळात नोकर्‍या गमावल्या त्यांचं नक्की कसं चाललंय, हे राज्यकर्ते कधी सांगतील काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

ते म्हणतात की अयोध्या दिवाळीप्रमाणे सजू लागली आहे असे वाचले. त्याचबरोबर राममंदिराचे पुजारी व तेथील सेवक, सुरक्षा रक्षकांवर कोरोनाने हल्ला केल्याची बातमी समोर आली. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गात भूमिपूजन सोहळा नक्की कसा होणार ते पाहावे लागेल.

मंदिराचे भूमिपूजन होत आहे हे महत्त्वाचे. रामाचा वनवास भक्तांनी संपवला असला तरी सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे हे आपले पंतप्रधानसुद्धा मान्य करतील. जीवनासंबंधी एवढी विवंचना आणि असुरक्षितता आजपर्यंत कधी कुणाला वाटली नसेल. कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या देशात 10 कोटी लोक रोजगार गमावणार आहेत. हा वरवरचा आकडा आहे. ‘कोरोना मंदी’मुळे किमान 40 कोटी कुटुंबांच्या उपजीविकेवर आक्रमण होईल असा माझा अंदाज आहे. चार लाख कोटींचा फटका व्यापार उद्योगास बसला आहे. 

त्यात लहान व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात आहेत. लोकांच्या संयमालाही मर्यादा आहेत. नुसत्या आशेवर आणि आश्वासनांवर लोकांनी कुठवर दम काढायचा? गेल्या पंधरा वर्षांत लोकांची एकही अडचण दूर झाली नाही. उलट अडचणी वाढत गेल्या. कोरोनामुळे आज जगायचे कसे, हा एकच प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून प्रत्येक घरात उभा ठाकला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे पंतप्रधान मोदी यांचे मित्र आहेत. आर्थिक डबघाई आणि कोरोनासंदर्भातले अपयश यामुळे संतापलेल्या इस्रायली जनतेने जागोजागी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. इस्रायलची जनता पंतप्रधान नेतान्याहू यांचा राजीनामा मागत आहे. ही वेळ हिंदुस्थानवरही येऊ शकते.

बेकारांचे काय? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, लाखो नव्हे, कोट्यवधी लोक आज बेकार होऊन घरी बसले आहेत. आभाळाला अनेक भोके पडली आहेत. अनेक धंदे बंद पडले आहेत. दुकानाला टाळी लागली आहेत. उद्योगांचे दिवाळे वाजले आहे. शिक्षण बंद पडले आहे. नोकरकपात आहेच, पण नोकर्‍या आहेत त्यांची पगारकपात झाली आहे.

महागाई, गरिबी आणि बेकारी यांचे असंख्य वणवे समाजात भडकले आहेत. कोविडचे युद्ध हे रणांगण आहेच. या रणांगणात सरकार उतरलेच आहे. रणांगणाच्या आघाडीपेक्षाही आर्थिक आघाडी महत्त्वाची आहे. जे प्राण कोविडच्या रणांगणात वाचवले, ते प्राण आर्थिक आघाडीवर गमावले तर नक्की कमावले काय, हा प्रश्नच राहील. हनुमान चालिसा पठणाने कोरोना जाईल हे खरे असेल तर हनुमान चालिसा पठणाने रोजगार गमावलेल्या 10 कोटी लोकांना जगण्यापुरते तरी काम मिळेल काय, असे रोखठोकमध्ये नमूद केले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख