संजय राऊत म्हणाले, "हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का.." ?  - Why is Prime Minister Narendra Modi silent on Hathras case? | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत म्हणाले, "हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का.." ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

माध्यम स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय... हा डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अपमान आहे.

मुंबई : हाथरस प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का.. ? या घटनेबाबत मोदींनी जनतेला विश्वास घेऊन सत्य सांगणे गरजेचे आहे. योगी सरकार माध्यमांना का अडवत आहे. माध्यम स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय... हा डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अपमान आहे, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, "हाथरस घटनेमुळे देशाला धक्का बसला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांसमोर सत्य आणू देणं महत्वाचे आहे. त्या मुलीवर "ते" अंत्यसंस्कार होते की उत्तरप्रदेश सरकारचा "तो" पाप लपविण्याचा प्रयत्न होता." महाराष्ट्रात एका नटीचे बेकायदा बांधकाम पाडले, ती मुंबईत आल्यावर तिला सरंक्षण देण्यासाठी जे भाजप नेते, दलित नेते पुढे सरसावले होते, ते आता कुठे गेले आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.  

हाथरसमध्ये झालेल्या दलित युवतीवरील बलात्कारानंतर प्रियंका गांधी यांनी काल प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. घटनेनंनतर हाथरस आणि परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हाथरसमधील युवतीवर पाच नराधमांनी बलात्कार करून तिचा मारहाण केली होती. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या युवतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा मृतदेह गावात आणला पण, पोलिसांनी तिच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना विश्वासात न घेता परस्पर अंत्यसंस्कार केल्याने संताप व्यक्‍त केला जात आहे.

पोलिसांचे म्हणणे असे आहे, की त्यांच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले तर मुलीचे आईवडील म्हणतात आमच्या मुलीचा साधा चेहराही आम्ही पाहू शकलो नाही. माध्यमांनीही या घटनेवरून प्रशासनाला काही प्रश्‍न विचारले आहेत. या घटनेचे जे व्हिडिओ पुढे आले आहेत त्यावरून प्रशासन आणि पोलीस खाते तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे. 

राहुल गांधी यांनी तर योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेत राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने यूपीच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठविले आहे. या पत्रात आयोगाने म्हटले आहे, की पिडित युवतीवर अंत्यसंस्कार मध्यरात्री करण्यात आले आहेत. तिच्या नातेवाईक अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते. हा जो आरोप केला जात आहे त्याबाबत तातडीने स्पष्टीकरण तातडीने द्यावे.  
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख