बिहारचे उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे? सुशील मोदी की कामेश्वर चौपाल? - Who will be new deputy Cm of Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारचे उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे? सुशील मोदी की कामेश्वर चौपाल?

वृत्तसंस्था
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील हे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या मंत्रीमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवर भाजप दावा सांगणार हे निश्चित आहे. भाजपला या निवडणुकीत ७५ जर नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) ला ४३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्याकडे भाजपचा कल राहणार आहे

पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला  (NDA) बहुमत मिळाले असले तरी आता मंत्रीमंडळातील समावेशावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. भाजपच्या बिहार विजयात मोठा वाटा असलेले सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी दलित नेते कामेश्वर चौपाल यांच्याकडे हे पद सोपवले जाण्याची शक्यता आहे.

मंत्रीमंडळाच्या समावेशासाठी एनडीएची महत्त्वाची बैठक आज पाटण्यात होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्रीच मुंबईहून बिहारला रवाना झाले असून आज दुपारी तेथे NDA ची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील हे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या मंत्रीमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवर BJP दावा सांगणार हे निश्चित आहे. भाजपला या निवडणुकीत ७५ जर नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) ला ४३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्याकडे भाजपचा कल राहणार आहे. उपमुख्यमंत्रीपद हे यापैकीच एक पद असेल. हे पद कामेश्वर चौपाल यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. कामेश्वर चौपाल हे राममंदीर चळवळीत आघाडीवर होते. 

कामेश्वर चौपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. १९८९ मध्ये राममंदीराची पहिली वीट ठेवल्याने ते चर्चेत आले होते. त्यावेळी ते विश्व हिंदू परिषदेत होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'रोटी के साथ राम' ही त्यांची घोषणा राममंदीर चळवळीत प्रसिद्ध झाली होती. त्यांनी आजवर तीन निवडणुका लढविल्या. मात्र, तिन्हींमध्ये ते पराभूत झाले होते. मात्र, भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपविण्याबाबत आग्रही असल्याचे बोलले जात आहे. राम विलास पास्वान यांच्या निधनामुळे आणि त्यांचे पूत्र चिराग पास्वान यांच्याशी सुरु असलेल्या रस्सीखेचीमुळे भाजपला दलित चेहेऱ्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने कामेश्वर चौपाल यांच्याकडे पाहिले जात आहे. 

बिहारमध्ये एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा राजीनामा राज्यपाल फगू चौहान यांच्याकडे सादर केला आहे. राज्यपालांनी एनडीएचा शपथविधी होईपर्यंत नितीश कुमार यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख