विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री बसचा पाठलाग करतात तेव्हा.... - When the Education Minister chases the bus for the students  | Politics Marathi News - Sarkarnama

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री बसचा पाठलाग करतात तेव्हा....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 जानेवारी 2021

बसच्या प्रतिक्षेत रस्त्या लगत थांबलेल्या विद्यार्थ्यांसाठी बस थांबविली नाही. त्याची दखल थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतल्याचा प्रसंग नुकताच घडला.

तुमकुरू (कर्नाटक) : बसच्या प्रतिक्षेत रस्त्या लगत थांबलेल्या विद्यार्थ्यांसाठी बस थांबविली नाही. त्याची दखल थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतल्याचा प्रसंग नुकताच घडला. यावेळी येथून जाणारे राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेचच आपल्या गाडीने बसचा पाठलाग केला. विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली. चक्क मंत्र्यांनीच पाठलाग करुन बस थांबवल्याने चालक आणि वाहकांची अक्षरश: थरकाप उडाला. 

कोरातागेरे तालुक्यातील नीलागोंदाना हल्ली हद्दीतील कॉलनी जवळ शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत मुले थांबली होती. बस आल्या नंतर मुलांनी हात उंचावून बस थांबवण्याची विनंती केली. मात्र, चालकाने बस थांबवलीच नाही. शाळेत जाणार्या मुलांसाठी बस थांबवण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आदेश असतानाही, केएसआरटीसीच्या बसने मुलांसाठी बस थांबवली नाही. त्यामुळे तुमाकुरु जिल्ह्यातील मधुगुरीला जाण्यासाठी निघालेल्या मंत्र्यांनी बसचा पाठलाग केला आणि राष्ट्रीय महामार्गावर त्या बसला आय. के. जवळ रोखले. 

शिक्षणमंत्र्यांनी बसचा पाठलाग करुन बस थांबवल्या नंतर विद्यार्थ्यांसाठी बस का थांबवली नाही, याचे चालक-वाहकाला स्पष्टीकरणच मागितले नाही. तर, त्या मार्गावर शाळेत जाणार्या मुलांसाठी सक्तीने बस थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केएसआरटीसीने ट्वीट केले की, “ही बाब तपासून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहे.” 

Edited By - Amol Jaybhaye

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख