प्रचारावर येणार निर्बंध? उच्च न्यायालयाच्या तंबीनंतर निवडणूक आयोग खडबडून जागे

नेत्यांच्या सभा, रोड शोमध्ये शारीरिक अंतर, मास्कचा वापर या नियमांची पायमल्ली होत आहे.
West Bngal election commission calls for an all party
West Bngal election commission calls for an all party

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेत्यांच्या सभा, रोड शोमध्ये शारीरिक अंतर, मास्कचा वापर या नियमांची पायमल्ली होत आहे. पण त्याकडे केंद्रीय निवडणूक आयोग, पंतप्रधानांसह सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे.

बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दररोज रुग्णसंख्येचे नवे विक्रम होत आहेत. निवडणूक आयोगाने केवळ कागदावर नियमावली जाहीर करून पक्षांना दिली. पण त्याचे पालन होत आहे किंवा नाही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अखेर उच्च न्यायालयानेच कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर चिंता व्यक्त करत प्रशासनाला फटकारले आहे.  

उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शारीरिक अंतराचे पालन करण्यासाठी गरज असेल तिथे कलम 144 लागू करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. प्रचारादरम्यान या नियमांचे पालन सक्तीने व्हावे, याकडे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास सांगितले आहे. सर्व आयोजकांनी मास्क घालणे, ठिकठिकाणी सॅनिटायझरचा वापर, गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेणे, अशा उपाययोजना न्यायालयाने सुचवल्या आहेत. 

न्यायालयाच्या या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला खडबडून जाग आली आहे. आयोगाने राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांची ता. 16 एप्रिल रोजी तातडीने बैठक बोलावली आहे. आयोगाकडून सर्व पक्षांना कोरोना नियमांच्या पालनासंदर्भात सुचना दिल्या जाऊ शकतात. तसेच प्रचारावर आणखी काही निर्बंधही लादले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. बंगालमध्ये आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान झाले असून चार टप्पे बाकी आहेत. 

दरम्यान, प्रचार सभा व रोड शोला होत असलेल्या गर्दीमुळे मंगळवारी 24 तासात सुमारे पाच हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. एक दिवसातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राजधानी कोलकातामध्येही एका दिवसातील सर्वाधिक 1300 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 जणांना मृत्यू झाला. बंगालमध्ये आतापर्यंत सुमारे सव्वा सहा लाख कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 10 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com